ध्रुव शेंडे ठरला आर्वीचा एक दिवसाचा बाल नगराध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 11:23 PM2018-02-04T23:23:28+5:302018-02-04T23:23:52+5:30
ऑनलाईन लोकमत
आर्वी : विद्यार्थ्यांत नेतृत्व गुण विकसित व्हावा, समाजकारण आणि राजकारण काय, याची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी याकरिता आर्वी नगर परिषदेच्यावतीने एक दिवसाचा बाल नगराध्यक्ष ही अभिनव संकल्पना मांडली. यात शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना सहभागी होण्याकरिता स्पर्धा ठेवली. या स्पर्धेत बावती मारत ध्रुव शेंडे या विद्यार्थ्यांने बाजी मारत एका दिवसाचा बाल नगराध्यक्ष होण्याचा मान पटकाविला.
शुक्रवारी सायंकाळी गांधी विद्यालयाच्या रंगमंचावर या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी हास्यसम्राट सुप्रसिद्ध कवी, गजलकार, गीतकार अभिनेता किशोर बळी यांची विशेष उपस्थिती होती. तर अतिथी म्हणून खा. रामदास तडस, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, जि. प. उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, माजी आमदार दादाराव केचे, डॉ. अरुण पावडे, डॉ. अविनाश लव्हाडे, डॉ. दिवाकर ठोंबरे, डॉ. विनय देशपांडे, डॉ. वसंत गुल्हाने, अॅड. शोभाताई काळे, उपमुख्याधिकारी रत्नमाला फटींग, उपसभापती धर्मेंद्र राऊत, डॉ. हरिभाउ विरुळकर, दुर्गेश पुरोहित, राजाभाऊ गिरीधर, अनिल जोशी, डॉ. श्याम भूतडा, सर्व शाळेचे प्राचार्य मुख्याध्यापक व नगरसेवकांची उपस्थिती होती.
आतिषबाजी आणि बँड पथकाचे संचलनात गोपनीय पेटी आणून विजेत्यांचे नाव या कार्यक्रमात जाहीर करण्यात आले. उत्कंठा कायम ठेवत एक एक पेटी मान्यवरांच्या हस्ते उघडण्यात आली. यावेळी प्रायोजकांतर्फे विजेत्यास गिफ्ट व्हाउचर देण्यात आले. सहभागी ५५ विद्यार्थ्यांना केशरी रंगाचे फेटे बांधण्यात आले होते. ही बाब प्रेक्षकांचे लक्ष वेधुन घेत होते. मुख्य आकर्षण असलेला हास्य कलाकार किशोर बळी यांचा वऱ्हाडी शैलीत हास्य विनोदाचा कार्यक्रम सादर केला. त्यांनी यावेळी नागरिकांचे प्रबोधनही केले.
कार्यक्रमाचे संचालन विद्या चिंचोरे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. नितीन बोखडे यांनी केले. चित्रफितीद्वारे या उपक्रमाची माहिती प्रा. विजय शेंडे यांनी दिली. प्रा. प्रमोद नागरे यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. उपस्थितांचे आभार प्रा. आभार संजय किटे यांनी मानले. यवतमाळचे ज्ञानेश्वर चौधरी, हिंगणघाटचे प्रा. अभिजित डाखोरे, पिंपळगावचे आशिष भोयर यांनी परीक्षक म्हणून काम केले. या कार्यक्रमाकरिता नगर परिषदेचे कर्मचारी सदस्य, गांधी विद्यालयाचे सर्व शिक्षक व कर्मचारी, बँड पथक, पोलीस विभाग, विद्युत विभाग, सर्व विद्यालये विद्यार्थी, पालकांनी सहकार्य केले. या नेत्रदीपक, शिस्तबद्द नियोजन, उत्कंठा वाढविणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरावर प्रशंसा होत आहे. हा प्रकल्प राज्यात राबविण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करणार असल्याचे प्रा. प्रशांत सव्वालाखे यांनी सांगितले.
उद्याचा भारत आजच्या विद्यार्थ्यांवरच - प्रशांत सव्वालाखे
शालेय विद्यार्थ्यात नेतृत्व गुण विकसित व्हावे. उद्याचा भारत आजच्या विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे. विद्यार्थी अभ्यास हा परीक्षेच्या दृष्टीने करतात त्यामुळे जीवनाशी निगाडित व्यवहारिक दृष्टिकोनातून नगरपालिका कार्यप्रणालीचा अभ्यास करण्यासाठी नगरपालिकेला अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा ध्यास असल्याने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांनी स्पष्ट केले.
अशी झाली निवडीची प्रक्रिया
या उपक्रमात शहरातील ८ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांच्या लेखी चाचणी आणि भाषण स्पर्धा घेऊन ५५ विध्यार्थी निवडण्यात आले. त्यानंतर पुन्हा परीक्षा घेऊन टॉप टेन विद्यार्थी ठरविण्यात आले. यात प्रचिती नासने, प्रथमेश काटकर, सार्थक सोनटक्के, पुष्पक साठे, अविरत राणे, ध्रुव शेंडे, साक्षी पोराटे, अविनाश खोंडे, गिरीधर भांडे, पायल हरेले, जान्हवी मरापे हे विजयी ठरले. सर्व प्रेक्षकांसमोर या दहा जणांनी 'बाल नगराध्यक्ष' यावर भूमिका विषद केली. त्यातून ध्रुव मनीष शेंडे हा विजयी ठरला.