वर्धा जिल्ह्यातील धुर्वे परिवाराने सागरी खाडी पोहून नोंदविला विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 01:32 PM2019-04-29T13:32:27+5:302019-04-29T13:32:51+5:30
जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील उमरविहिरा या आदिवासीबहुल गावातील धुर्वे परिवाराने मुंबईतील एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया ही १६ किलोमीटर अंतराची सागरी खाडी पोहून रविवारी विक्रम नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील उमरविहिरा या आदिवासीबहुल गावातील धुर्वे परिवाराने मुंबईतील एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया ही १६ किलोमीटर अंतराची सागरी खाडी पोहून रविवारी विक्रम नोंदविला. त्यांच्या या विक्रमाची एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
मुंबई येथे आयोजित सागरी अभियात सहभागी झालेले सुखदेव धुर्वे हे नागपूर येथील पोलीस प्रशासनात कार्यरत आहेत. ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू असून त्यांची पत्नी वैशाली धुर्वे, मुलगा सार्थक व मुलगी तन्वी हेही जलतरणपटू आहेत. त्यामुळे या धुर्वे परिवाराने एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडियापर्यंतची १६ कि.मी.अंतराची खाडी रिले पद्धतीने पार करून विक्रम नोंदविला. हे सागरी अभियान पूर्ण करण्याकरिता स्व.वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्ट, मिहीर सेन स्वीमिंग व स्पोर्टिंग क्लब, डॉल्फीन स्वीमिंग क्लब व व्हिक्टोरियस स्वीमिंग स्पोर्टिंग क्लब यांचे सहकार्य लाभले. या अभियानादरम्यान स्व. वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे मार्गदर्शक सुधीर दिवे सपत्नीक धुर्वे परिवारासोबत होते. धुर्वे परिवाराच्या या विक्रमाने जिल्ह्याचे नावलौकीक केले आहे. त्यांच्या या विक्रमाबद्दल उपस्थितांनी त्यांचा सन्मानही केला.