मधुमेह रुग्णांची अत्याधुनिक कॅमेऱ्याने नेत्रतपासणी
By admin | Published: January 9, 2017 01:27 AM2017-01-09T01:27:51+5:302017-01-09T01:27:51+5:30
सेलू येथील ग्रामीण रुग्णालयातील नेत्र विभागात अत्याधुनिक फंडस कॅमेरा तैनात करण्यात आला आहे. या
ग्रामीण रुग्णालयात फंडस कॅमेरा : सेलू ग्रामीण रुग्णालयाला मिळाला पहिला मान
घोराड : सेलू येथील ग्रामीण रुग्णालयातील नेत्र विभागात अत्याधुनिक फंडस कॅमेरा तैनात करण्यात आला आहे. या अत्याधुनिक नेत्र तपासणी यंत्राद्वारे मधुमेह रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. यामुळे दिर्घकाळापासून मधुमेह असणाऱ्या रुगणांना दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांपैकी सेलू येथील ग्रामीण रुग्णालयाला सर्वप्रथम या यंत्राद्वारे तपासणी करण्याचा मान मिळाला आहे.
दिर्घकाळ मधुमेह असल्यास रुग्णांच्यसा डोळ्याच्या मागच्या पडद्यावर विपरित परिणाम होऊन बाधा निर्माण होण्याची शक्यता असते. अशा रुग्णांना ‘डायबेटीज रेटीनोपॅथी’ नावाचा आजार होण्याची शक्यता असते. यामुळे अंधत्व येण्याची दाट शक्यता असते. या अत्याधुनिक यंत्राद्वारे रुग्णांच्या डोळ्याच्या मागच्या पडद्याची (रेटीना) तपासणी केली जाते. अशा प्रकारचे नेत्र तपासणी यंत्र सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात आल्याने आता तालुक्यातील नेत्र रुग्णांची जिल्ह्याच्या ठिकाणी तपासणीकरिता ये-जा करण्याच्या त्रासापासून सुटका होणार आहे.
या यंत्राद्वारे तपासणी केल्यानंतर डायबेटीज रेटीनोपॅथीचा रुग्ण आढळल्यास त्या रुग्णाला पुढील उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात उपचार करण्यास सहकार्य केले जाणार आहे. ग्रामीण रुग्णालयातील नेत्रतज्ज्ञ डॉ. जीवन तांबेकर, सेवाग्राम येथील नेत्र चिकित्सक डॉ. अथर शेख नेत्र रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी या यंत्राद्वारे करीत आहेत.
दिर्घकाळापासून मधुमेह असणाऱ्या रुग्णांचे ग्रामीण भागात १० टक्के तर शहरी भागात १७.६ टक्के प्रमाण आहे. भारताबाहेरील देशात ३४ टक्के रुग्ण ‘डायबेटीज रेटीनोपॅथी’च्या आजाराचे आढळून येत असल्याची माहितीही रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली. अत्याधुनिक फंडस कॅमेरा सेलू येथील रुग्णालयात लावल्याने ेतालुक्यातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे. दिर्घकाळापासून मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी आपली या यंत्राद्वारे तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही डॉ. तांबेकर यांनी केले आहे. जिल्ह्यातील आरोग्य सेवा अत्यंत सुसज्ज आणि अत्याधुनिक सुविधायुक्त होत असल्याने रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळू लागली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयांमध्येही अत्याधुनिक सुविधा पोहोचल्याने ग्रामीण रुग्णांत समधानाचे भाव दिसताहेत.(वार्ताहर)
ग्रामीण आरोग्य सेवाही टाकतेय कात
४पूर्वी शासकीय रुग्णालये म्हटल की, गरिबांसाठी असलेला दवाखाना, असा समज होत होता; पण दिवसागणिक शासकीय आरोग्यसेवा कात टाकत आहे. आता ग्रामीण भागातही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होत असल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे. सेलू रुग्णालयातील फंडस कॅमेराही त्याचाच भाग आहे.