नागरिकांच्या तत्काळ मदतीसाठी डायल @ ११२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 03:35 PM2021-01-20T15:35:11+5:302021-01-20T15:37:15+5:30

Wardha News पोलीस विभागाच्या मदतीसाठी १००, अग्निशमन १०१, रुग्ण्वाहिका १०८ आणि चाईल्ड लाईनसाठी १०९८ असे वेगवेगळे टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आले आहेत. संबंधित टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास तत्काळ मदत पुरविली जाते.

Dial @ 112 for immediate help to citizens | नागरिकांच्या तत्काळ मदतीसाठी डायल @ ११२

नागरिकांच्या तत्काळ मदतीसाठी डायल @ ११२

Next
ठळक मुद्देपोलीस दलात चार नवे वाहन दाखल जीपीएसमुळे रिस्पॉन्स टाईम होणार कमी

 लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा : ३१ डिसेंबरची रात्र, १०० नंबरवरील कंट्रोल रूमला फोन... पलीकडील व्यक्तीला अचानक आवाज येतो... नमस्कार, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय... आपली काय मदत करू... अविश्वासाने रिसिव्हरकडे पाहत ती व्यक्ती आनंदनगरमधील आपल्या सोसायटीत काही तरुण गोंधळ करत असल्याचे सांगते...चक्रे तत्काळ फिरतात...आणि लगेच पोलीस समस्या सोडवितात... याच कार्यशैलीचा अनुभव आता प्रत्येकाला मिळण्यासाठी पोलीस प्रशासन जीपीएससारख्या प्रगत प्रणालीशी आपली हेल्पलाईन जोडत आहे. त्यामुळे प्रत्येक तक्रारीला ‘क्विक रिस्पॉन्स’ मिळून ती समस्या कमीत कमी वेळेत सोडविण्यासाठी ११२ ही नवी हेल्पलाईन पोलीस दल सुरू करीत आहे.

पोलीस विभागाच्या मदतीसाठी १००, अग्निशमन १०१, रुग्ण्वाहिका १०८ आणि चाईल्ड लाईनसाठी १०९८ असे वेगवेगळे टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आले आहेत. संबंधित टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास तत्काळ मदत पुरविली जाते. हे सर्व क्रमांक पोलीस खात्याशी निगडित आहेत. मात्र, या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर कधी मदत मिळण्यास विलंब झाल्यास पोलीस विभागावरच खापर फोडले जात होते. यातून नागरिकांमध्ये पोलिसांची प्रतिमा मलीन होत होती. नागरिकांत पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासोबतच सर्वसामान्यांच्या तक्रारींचा निपटारा तातडीने करणे सोयीचे व्हावे म्हणून केंद्र सरकारने हे सर्व टोल फ्री क्रमांक आता एकाच क्रमांकावर करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात इमरजन्सी रिस्पॉन्स सिस्टीम या नावाने महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा ही कंपनी या योजनेची अंमलबजावणी करणार आहे. मुंबई आणि नागपूर येथे नियंत्रण कक्ष (पीसीसी) राहणार आहेत. जिल्हास्तरावर इमरजन्सी रिस्पॉन्स व्हिकल (ईआरव्ही)चे स्वतंत्र युनिट स्थापन करण्यात आले आहे. यासाठी वर्धा पोलीस दलाला ४ वाहने उपलब्ध झाली आहेत. या वाहनात जीपीएस सिस्टीमसह अत्याधुनिक सुविधा राहणार आहे. प्राथमिक स्तरावर सर्व प्रक्रिया घटनास्थळी दाखल झाल्यानंतर केल्या जाणार आहे. त्याचा फायदा प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयातील युनिटमध्ये पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत किचक, सहाय्यक पोलीस निरीक्षक राखुंडे हे २४ तास कर्तव्यावर राहणार आहेत. या युनिटमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांवर केवळ तक्रर प्राप्त झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळावर पोहोचून मदत करणे, एवढीच जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. त्यामुळे समाजातील गरजूंना या माध्यमातून तत्काळ मदत पोहोचण्यास निश्चितपणे मदत होणार आहे.

२ अधिकारी, ८ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण

जानेवारी महिन्याच्या अखेरीस डायल ११२ ही नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेविषयीचे ज्ञान उपलब्ध व्हावे, या उद्देशातून दोन पोलीस अधिकारी आणि ८ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. तर जिल्ह्यातील उर्वरित कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात वायरलेस, संगणकाचे ज्ञान देणयात आले. पोलीस निरीक्षक, साहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्याद्वारे मार्गदर्शन करण्यात आले आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

ही सेवा जीपीएस यंत्रणेद्वारे कार्यान्वित होणार आहे. आपात्कालीन परिस्थितीतील कोणत्याही व्यक्तीने ११२ हा क्रमांक डायल केला की, तो फोन तत्काळ मुंबई आणि नागपूरस्थित कॉल सेंटरला जाईल. तेथून घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटना घडलेल्या परिसरात पोलिसांच्या जीपीएस व्हॅनमधील लॅपटॉपवर तसेच बॉमटॉम जीपीएस यंत्रणा असलेल्या दुचाकीवरील मार्शलला मिळेल. त्यामुळे मार्शल लगेच घटनास्थळी पोहोचून मदत करेल.

फेक फोनचा निपटारा

११२ क्रमांकावर आलेल्या फोनचे लोकेशन कॉल सेंटरमधील प्रतिनिधीला लगेच कळेल. हीच माहिती परिसरातील पोलिसांच्या गाडीवरील जीपीएस यंत्रणेद्वारा मिळेल. ते वाहन घटनास्थळी पोहोचले का किंवा पोहोचण्यास किती वेळ लागेल आदी माहिती लगेच मिळणार आहे.

कंट्रोल रूम ते लोकल कनेक्शन

सर्वसामान्य नागरिकांनी डायल ११२ क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर थेट नागपूर येथील नियंत्रण कक्षातील कर्मचारी संवाद साधतील. या संवादात ठिकाण, समस्येचे स्वरूप आणि नाव नोंदविले जाईल. त्यानंतर कंट्रोल रूममधून थेट त्या क्षेत्रातील इमरजन्सी रिस्पॉन्स व्हेहिकल युनिटशी अवघ्या काही सेकंदात संपर्क साधला जाईल. पोलीस अधीक्षक कार्यालयातील युनिटमधील कर्मचारी काही मिनिटांत घटनास्थळावर दाखल होवून मदत करणार आहे. कंट्रोल रूम ते लोकल कनेक्शनमुळे तक्ररींचा निपटारा होण्यास किंवा सर्वसामान्यांना मदत मिळविणे सहजशक्य होणार आहे.

Web Title: Dial @ 112 for immediate help to citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस