विवाहविषयक बाबींवर संवाद आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:56 AM2017-09-14T00:56:30+5:302017-09-14T00:56:47+5:30
आपल्याकडे विवाहासारख्या मानवी जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींबाबत सामाजिक-धार्मिक अटी व बंधनामुळे मोकळा संवाद होत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आपल्याकडे विवाहासारख्या मानवी जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींबाबत सामाजिक-धार्मिक अटी व बंधनामुळे मोकळा संवाद होत नाही. परिणामी आज भारतीय विवाह संस्था वाढत्या घटस्फोटांच्या संख्येने व पती-पत्नीतील दुराव्यांमुळे कमकुवत ठरत आहे. हे टाळायचे असेल तर आता विवाहापुर्वीचं मुलामुलींचे मानसिक, वैद्यकीय, सामाजिक व कायदेशीर समुपदेशन होणे काळाची गरज आहे, असे मत महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम येथील प्रसुतीतज्ज्ञ डॉ. सुरेखा तायडे यांनी मांडले.
प्रियदर्शिनी महिला महाविद्यालय येथे महिला तक्रार निवारण समितीने विवाहपूर्व समुपदेशन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात त्या साधन व्यक्ती म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रंभा सोनाये, जिल्हा सत्र न्यायालयाचे अॅड. अजित सदावर्ते, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. के.पी. निंबाळकर उपस्थित होते.
दुसºया सत्रात ‘महिलांविषयक कायदे’ या विषयावर बोलतांना अॅड. सदावर्ते म्हणाले, नितिमत्तेने माणुस वागला तर कायद्याची गरज पडणार नाही. त्यामुळे कुटुंबातूनच मुलामुलींवर नीतीमत्तेचे संस्कार झाले तर विवाह हा आनंददायीच होईल.
तिसºया सत्रात डॉ. निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले. शिक्षणाच्या धावपळीत कुटुंबातून मुलामुलींना अत्यावश्यक घरगुती कामे शिकविली जात नसल्यामुळे विवाहानंतर कामाची सवय नसणे हाच मोठा प्रश्न बनून कौटुंबिक सौख्य लोप पावते. अनेकदा क्षणिक आकर्षणातून मुली स्वत:ची फसगत करुन घेतात. त्यामुळे मुलींनी अधिक चौकस व सजगपणेच आपला जीवनसाथी निवडायला हवा असे ते म्हणाले.
कार्यशाळेला न्यू इंग्लिश हायस्कूल, लोक महाविद्यालय, सेंट जॉन हायस्कूल, कन्या विद्यालयातील शिक्षिका व विद्यार्थिनी उपस्थिती होत्या. कार्यक्रमातील विविध सत्राचे संचालन डॉ. सोनाली सिरभाते, डॉ. प्रतिभा ताकसांडे, डॉ. अनिता देशमुख यांनी केले. प्रा. मदनमोहन विश्वकर्मा, डॉ. सुधाकर सोनोने, डॉ. मालिनी वडतकर डॉ. प्रियराज महेशकर, डॉ. धनंजय सोनटक्के, डॉ. रेखा बोबडे, प्रा. मृणालिनी गुडदे, प्रा. अमोल घुमडे, प्रा. प्रदीप दखणे, प्रा. दीपक महाजन, विजय चौधरी, विनोद बावणे, दिनेश भगत, राजू मुंजेवार, प्रमोद माथनकर, नरेश आगलावे यांनी सहकार्य केले.
महिलांना हक्क व कायदे विषयक मार्गदर्शन
वर्धा - यशवंत महाविद्यालयाच्या महिला तक्रार निवारण समितीतर्फे महिलांचे हक्क व कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी चर्चासत्र घेण्यात आले. समितीच्या प्रमुख डॉ. कल्पना कुळकर्णी यांनी चर्चासत्राचे आयोजन केले. बाहेरगावावरुन महाविद्यालयार येणाºया विद्यार्थिनींना छेडछाड, पाठलाग, अश्लील बोलणे याचा नेहमीच सामना करावा लागतो. समाज काय म्हणेल, घरचे आपल्यालाच दोष देतील या भीतीने त्या हे सगळे लपवून ठेवतात. त्यामुळे त्रास देणाºया उनाड मुलांचे धैर्य वाढते. याचे कालांतराने परिवर्तन विनयभंगात होऊ शकते. हे टाळावयाचे असेल तर सर्वप्रथम विद्यार्थिनींना स्वत:च्या हक्काची जाणीव असणे आवश्यक आहे. तसेच कायद्याचा अधिकार कसा वापरु शकतो याविषयी न्यायाधीश अपूर्वा भासारकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. महाविद्यालयात किंवा बाहेर असताना कोणालाही मोबाईल नंबर देऊ नये, तसेच विलंब न करता त्या व्यक्तीविरुद्ध समितीकडे लगेचच तक्रार करावी, दुष्टचक्रात अडकण्यापासून स्वत:ला वाचवावे असे आवाहन प्राचार्य डॉ. विलास देशमुख यांनी केले. संचालन डॉ. सिंघम यांनी तर आभार प्रा. चंदनकर यांनी मानले.