पाणी बदलाने डायरियाचे रुग्ण वाढले

By admin | Published: July 8, 2017 12:05 AM2017-07-08T00:05:46+5:302017-07-08T00:05:46+5:30

पावसाळा येताच पाण्यातील बदलामुळे जिल्ह्यात डायरीयाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र

Diarrhea patients with water change increased | पाणी बदलाने डायरियाचे रुग्ण वाढले

पाणी बदलाने डायरियाचे रुग्ण वाढले

Next

पाणी उकळून पिण्याचा सल्ला : खासगीसह प्राथमिक आरोग्य केंद्र फुल्ल
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पावसाळा येताच पाण्यातील बदलामुळे जिल्ह्यात डायरीयाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी रुग्णालयातही गर्दी आहे. यात चिमुकल्यांची संख्या अधिक असून काही ज्येष्ठांचाही समावेश आहे. यामुळे नागरिकांनी वेळीच जागरूक होत आरोग्याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
पाण्यामुळे उद्भवत असलेल्या या आजारावर आळा बसविण्याकरिता नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. नळांना अथवा विहिरींना आलेले पाणी उकळून थंड करून पिणे गरजेचे आहे. दूषित पाण्याचा सर्वाधिक प्रभाव चिमुकल्यांच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसून आले आहे. सोबतच बदलत्या वातावरणामुळे अनेकांना व्हायरल फिवरनेही ग्रासल्याचे दिसून आले आहे. व्हायरल फिवरची लागण झाल्यास पालकांनी त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविण्याचे टाळावे. एकापासून इतर बालकांना फिवरची लागण होत असल्याचे बालरोग तज्ज्ञांनी सांगितले आहे.
दूषित पाणी पिल्याने डायरीया होत असल्याचे शास्त्रीय कारण आहे. वर्धा शहरासह ग्रामीण भागात होणारा पाणी पुरवठा हा नियमानुसार शुद्धीकरण करून होतोच असे नाही. होत असलेल्या पाणी पुरवठ्याच्या तुलनेत जिल्ह्यात शुद्धीकरणाची सुविधा तोकडी असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरात कालबाह्य झालेल्या शुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होत आहे. यातच पालिकेच्या नळाचे पाईप फुटून त्यातूनही दूषित पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे.

जलरक्षकांची जबाबदारी वाढली
शहरात अथवा गावात पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांना सोपविण्यात आली आहे. शहरात नगर परिषद आणि गावात ग्रामपंचायतीची नळयोजना आहे. या योजनेतून शुद्ध पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी त्यांची आहे. होणारा पाणी पुरवठा शुद्ध आहे अथवा नाही याची तपासणी करण्याचे काम जलरक्षकांचे आहे. त्यांच्याकडून पाण्याची तपासणी करणे गरजेचे आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने होत असलेला पाणी पुरवठा तपासून त्याची माहिती संबंधितांना देत त्यावर उपाययोजना आखण्याच्या सूचना करणे अपेक्षित आहे.
ग्रामपंचायतींनी ब्लिचिंग पावडर टाकावे
गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी अथवा इतर स्त्रोतात ग्रामपंचायतीने ब्लिचिंग पावडर टाकून पाण्याचे निर्जंतूकीकरण करणे गरजेचे आहे. ब्लिचिंग पावडर खरेदीचे अधिकारी ग्रामपंचातींना मिळाले असल्याने त्यांच्याकडून गावाच्या आरोग्याच्या सुरक्षेकरिता हा निर्णय स्वत: घेणे गरजेचे झाले आहे.

पाण्याच्या बदलामुळे डायरीयाची लागण होते. यामुळे नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व ओषधांचा साठा पोहोचविण्यात आला आहे. नागरिकांनी घरगुती उपाय करण्यापेक्षा रुग्णालयात जावे.
- डॉ. दुर्योधन चव्हाण, जिल्हा आर्रोग्य अधिकारी.

पावसाळ्याच्या दिवसात पाण्यात होत असलेल्या बदलामुळे डायरीयाची लागण होत असल्याचे वाढत असलेल्या रुग्णसंख्येवरून दिसत आहे. पाण्याच्या बदलाचा विशेष परिणाम चिमुकल्यांवर होत आहे. यामुळे पालकांनी पाणी उकळून आणि गरम करून प्यावे. सोबतच बदलत्या वातावरणामुळे व्हायरल फिवरचे रुग्णही वाढत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे पालकांनी तापाची लागण होताच मुलाला शाळेत पाठवू नये. अशा बालकांमुळे इतरांनाही त्याची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- डॉ. सचिन पावडे, बालरोग तज्ज्ञ, वर्धा.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डात डायरीयाची लागण झालेले रुग्ण उपचार घेत आहे. पाण्याच्या बदलामुळे हा आजार होतो. शिवाय नागरिकांनी उघड्यावरील पदार्थ खाणे टाळत पाण्याचे शुद्धीकरण करून ते पिणे गरजेचे आहे.
- डॉ. निवृत्ती राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक .

 

Web Title: Diarrhea patients with water change increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.