डिझेल दरवाढीने एसटीवर पडतोय ताण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 03:07 PM2021-02-03T15:07:25+5:302021-02-03T15:09:39+5:30
Wardha News डिझेल दरवाढीचा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसलाही बसला असून महिन्याला तीन कोटी रूपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : डिझेल दरवाढीचा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसलाही बसला असून महिन्याला तीन कोटी रूपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे. कोरोनामुळे सध्या एसटीच्या फेऱ्या कमी असल्या तरी डिझेल दरवाढीचा मोठा ताण एसटी बसवर पडत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे मार्च ते नोव्हेंबर महिन्यांपर्यंत एसटीची सेवा बंद होती. कोरोना काळापूर्वी जिल्ह्यातील पाच आगारातून दररोज ५००वर बसफेऱ्या होत्या. मात्र, आता त्या कमी झाल्या असून दिवसा अंदाजे २१० बस फिरतात. एक बस दररोज किमान ३४० ते ३५० सरासरी किलोमीटरचा प्रवास करते. एका एसटीचे ॲव्हरेज चार ते पाच किलोमीटर प्रति लिटर आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एसटीच्या फेऱ्या कमी झाल्या तरीही डिझेलवरील खर्चही वाढला आहे.
सध्या डिझेलच्या वाढत्या दरामुळे प्रति किलोमीटर २ रूपये ४० पैशांनी डिझेल महाग पडते. त्यातच प्रवासी संख्या कमी झाल्याने एसटीचा तोटा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
जिल्ह्यातील पाच आगारातून दररोज २५० एसटी बस धावत होत्या मात्र, आता कोरोनामुळे या फेऱ्या कमी होऊन २१० एसटी दररोज धावत आहे. एसटीचे दररोजचे वाहतूक उत्पन्न २० लाखांचे असून डिझेलवर तब्बल ३ कोटी ५० लाख रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
ट्रान्सपोर्ट चालकांचे मोडले कंबरडे
अव्वाच्या सव्वा आकारल्या जात असलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या करांच्या ओझ्याखाली दबलेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळणे गरजेचे आहे. डिझेलचे दर इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने अतिरिक्त आर्थिक भार सहन करून मालवाहतूक करणे अवघड झाले आहे. वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या दरामुळे ट्रान्सपोर्ट चालकांचे कंबरडे मोडले आहे.
नागरिकांच्या खिशाला बसतेय झळ
पेट्राेलचे भाव दररोज वाढत असल्यामुळे नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. सत्ताधारी अन् विरोधी सगळेच राजकीय पक्ष या गंभीर विषयात अद्यापही सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहिले नसल्याचे दिसून येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सोशल मीडियावरही कच्चा तेलाचे दर आणि बाजारातील दर तसेच आजचे दर यातील तफावत लोक मांडताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल...
पेट्राेलचा दर १०० रुपये प्रति लिटर होईल...सज्ज राहा, एकदा का पेट्राेलचा दर १०० रूपये प्रति लिटर झाला की ताबडताेब वाहनावरून खाली उतरा, आपले हेल्मेट काढा आणि आकाशाकडे पाहा, शतक ठोकल्यानंतर अशा पद्धतीने अभिवादन करायची प्रथाच आहे. अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे.
जिल्ह्यात एकूण आगार- ०५
एसटीच्या एकूण फेऱ्या- २५०
सध्या दररोजच्या फेऱ्या- २१०
एका बसचा दररोजचा प्रवास- ३४० किमी
डिझेलचा खर्च- ३ कोटी ५० लाख
दररोजचे सरासरी वाहतूक उत्पन्न -- २० लाख