विविध ठिकाणी वीज पडून चार बैल ठार
By admin | Published: June 6, 2017 01:11 AM2017-06-06T01:11:27+5:302017-06-06T01:11:27+5:30
रविवारी सायंकाळी अचानक मेघगर्जनेसह आलेल्या वादळामुळे कित्येक गावातील घराचे छपरे उडाली ...
समुद्रपूरात छप्पर उडाले : पवनारात घर पडले
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर / पवनार : रविवारी सायंकाळी अचानक मेघगर्जनेसह आलेल्या वादळामुळे कित्येक गावातील घराचे छपरे उडाली तर शेगाव(गो) परडा, बोथली गावात वीज पडून चार बैल ठार झाले. पवनारातही घर कोसळले.
रविवार सायंकाळी मेघगर्जनेसह वादळाला सुरुवात झाली. त्यामध्ये वादळाचा अनेक गावाला फटका बसला तर वीजपडून चार बैल ठार झाले. त्यामध्ये बोथली येथील शेतकरी अनिल धुर्वे यांचे दोन बैल शेतात बांधून असल्याने वीज पडून दोन्ही बैल ठार झाले. परडा येथील शेतकरी मधुकर चंदनखेडे यांचा शेतात बैल बांधून होते. तेथे सुद्धा वीज पडल्याने एक बैल ठार झाला तर एक बैल बचावला. शेगाव(गो.) येथील शेतकरी बापूराव वारलू खिरटकर यांच्या शेतात वीज पडल्याने त्यांचा सुद्धा एक बैल ठार झाला.
परडा येथील कित्येक घराच्या टिनाच्या शेडसह छपऱ्या उडाल्याने शेतकरी शेतमजुरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामध्ये वासुदेव लोख, भारत गायकवाड, सुभाष महाकाळकर, अनंता महाजन, विष्णु तडस, कैलास शंभरकर, शिवदास घाटुर्ले आदिंचे नुकसान झाले तर पाईकमारी येथील वादळाने कित्येक घराचे नुकसान झाले. वसंतराव दोंदल, मधुकर गुरनुले यांचे मोठे नुकसान झाले.
ऐन हंगामात शेतकऱ्याचे बैल ठार झाल्याने त्या शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. तेव्हा त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आहे.
सदर घटनेचा पंचनामा करीत तहसीलदार दीपक करंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला असल्याचे सांगितले.
वादळी पावसामुळे घर भुईसपाट
पवनार येथे रविवारी सकाळी झालेल्या वादळी पावसामुळे येथील अनेकांच्या घरावरची छत, कवेलू उडाल तर काहींचे घर कोसळून नुकसान झाले. या वादळी पावसामध्ये वॉर्ड क्र. ६ येथील कुंदन कळणे यांचे विटा मातीचे राहते घर कोसळले. त्यांनी एक दिवस अगोदरच या घरातून आपले सर्व साहित्य दुसरीकडे हलविले होते. त्यानंतर आज सकाळी ही घटना घडली. या घटनेने घरावरील छत उडून घरामध्ये पाणी शिरले. त्यात त्यांच्या अन्न धान्यांची नासाडी झाली. याच वॉर्डातील गणेश मसराम यांच्या घरावरील कवेलू उडाली व घरात पाणी शिरुन नुकसान झाल्याची घटना घडली.