दैनंदिन व्यवहारात एटीएममुळे अडचणी
By admin | Published: April 25, 2017 01:00 AM2017-04-25T01:00:53+5:302017-04-25T01:00:53+5:30
नोटबंदीनंतर मोठा कालावधी लोटला असताना दैनंदिन व्यवहार सुरळीत झालेले नाहीत.
नागरिकांची भटकंती : ‘नो कॅश’ आणि ‘एटीएम बंद’च्या फलकांमुळे गोची
वर्धा : नोटबंदीनंतर मोठा कालावधी लोटला असताना दैनंदिन व्यवहार सुरळीत झालेले नाहीत. सर्वत्र ‘डिजिटल पेमेंट’वर भर दिला जात असला तरी शहरातील बहुतांश व्यवहार ‘कॅश’नेच करावे लागतात. यात नो कॅश व एटीएम बंद आहे, या फलकांनी नागरिकांची चांगलीच बोळवण केली आहे. परिणामी, दैनंदिन व्यवहारच अडचणीत आले आहेत.
शहरातील बहुतांश एटीएम बंद असल्याने नागरिकांची रकमेकरिता भटंकती होत आहे. मागील दहा दिवसांपासून सर्वच राष्ट्रीयकृत बँकांची एटीएम सेवा बंद पडल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रोख रकमेकरिता भर उन्हात या एटीएमवरून त्या एटीएमवर भटकावे लागत असून निराश होऊनच परतावे लागत आहे. महाराष्ट्र बँकेचे बॅचलर रोडवरील एटीएम अनेक दिवसांपासून बंद आहे. नो कॅशचा फलक गळ्यात अडकलेला दिसतो. याबाबत नागरिकांनी व्यवस्थापनाला सूचित केले; पण दुर्लक्ष केले जात आहे. चलन तुटवडा असल्याचे कारण पुढे केले जात आहे. चलन तुटवडा आहे तर खासगी बँकांचे एटीएम कसे सुरू आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बँकेतील काउंटरवर गर्दी होऊ नये म्हणून ग्राहकांच्या सेवेकरिता एटीएम सेवा सुरू करण्यात आली; पण एटीएम सदैव बंदच असतात. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
बॅँकेतील नोटांच्या तुटवड्यामुळे ग्रामीण भागातील व्यवसाय ठप्प
रोहणा - नोटाबंदीच्या निर्णयापासून ग्रामीण भागातील बँकांना मागणीच्या प्रमाणात पतपुरवठा होत नाही. परिणामी, खातेधारकांना आवश्यक रक्कम देत नसल्याने ग्रामीण भागातील लहान-मोठ्या व्यवसायांवर विपरीत परिणाम होत आहे.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकामधील रकमांची स्थिती अद्याप पूर्वस्थितीत आली नाही. शासन कितीही घोषणा करीत असले तरी ग्रामीण भागातील बँकांतून ग्राहकांना आपल्या खात्यातून आवश्यक तेवढी रक्कम मिळत नाही. यामुळे नागरिकांना आवश्यक वस्तुंची खरेदी करता येत नाही. दहा हजारांचे काम दोन हजारांत भागवावे लागत आहे. परिणामी, बाजारातील खरेदीवर विपरत परिणाम झाला असून ग्रामीण भागातील व्यावसायिक हातावर हात धरुन बसून आहेत. याउलट शेतकरी आपला शेतमाल शहराच्या बाजारपेठेत आणून विकतो. यामुळे आलेल्या रकमेतून शहरातूनच आवश्यक वस्तुंची खरेदी करतो. परिणामी, शहरी व्यावसायिकांना ग्राहक मिळतात तर ग्रामीण भागातील लहान-मोठ्या दुकानदारांची दररोजची आवक मंदावली आहे. यासाठी बँकेतून मिळणाऱ्या रकमेत सुधारणा होणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)