गतिरोधकच ठरतेय डोकेदुखी
By Admin | Published: May 6, 2016 01:59 AM2016-05-06T01:59:23+5:302016-05-06T01:59:23+5:30
शहरात काही दिवसांपासून नागरिकांनी स्वत:च्या मर्जीप्रमाणे आवश्यकता नसताना ठिकठिकाणी उंच गतिरोधक निर्माण केले आहेत.
अपघातास कारणीभूत : उंच गतिरोधक काढून टाकण्याची मागणी
वर्धा : शहरात काही दिवसांपासून नागरिकांनी स्वत:च्या मर्जीप्रमाणे आवश्यकता नसताना ठिकठिकाणी उंच गतिरोधक निर्माण केले आहेत. सदर गतिरोधक सिमेंट काँक्रीटचे असल्याने वाहन चालकांना अधिकच त्रास सहन करावा लागतो. कुठल्याही मापदंडात न बसणारे हे गतिरोधक अनेक आजारांचे कारण ठरत आहे. बांधकाम विभाग व पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत सदर गतिरोधक काढावे, अशी मागणी बापू युवा संघटनचे सुरेश पट्टेवार यांनी केली आहे. याबाबत न.प. मुख्याधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.
शहरातील प्रत्येक मार्गावर नागरिकांनी कुणालाही न विचारता उंच गतिरोधकांची निर्मिती केली आहे. सिमेंट काँक्रीटपासून बनविलेले हे गतिरोधक शासनाच्या कुठल्याही मापदंडात बसत नाही. परिणामी, नागरिकांना शहरातील प्रत्येक रस्त्याने जाताना गतिरोधकांचा सामना करावा लागतो. गतिरोधक डांबराचे नसून सिमेंट काँक्रीटचे केल्याने त्याची उंचीही कमी होत नाही. वाजवीपेक्षा अधिक उंच गतिरोधक निर्माण केल्याने वृद्ध व महिलांना वाहने चालविणे कठीण झाले आहे. काही रस्त्यांवर तर असंख्य गतिरोधक निर्माण करण्यात आले आहेत. परिणामी, बहुतांश नागरिक तो रस्ताच नको, असे म्हणत दुसऱ्या रस्त्याचा अवलंब करीत असल्याचे दिसते. हा प्रकार विशेषत: अष्टभूजा चौकातून रामनगरकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत घडतो.
उंच गतिरोधक व त्यावर पांढरे, पिवळे पट्टे नसल्याने ते दिसत नाही. परिणामी, नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागते. वंजारी चौक ते लेप्रेसी फाऊंडेशनपर्र्यंत तब्बल १६ गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. ते फार जवळ जवळ असल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो. वास्तविक, इतक्या जवळ गतिरोधकाची गरज नाही. शहरातील बहुतांश वॉर्डात घरांचे बांधकाम सुरू असते. कुणाचीही पर्वा न करता घरासमोरून वाहने जातात म्हणून परवानगी न घेता स्वत:च्या घरासमोर गतिरोधक तयार केले जातात. हाच प्रकार या भागात घडल्याचे दिसते. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत गतिरोधक काढण्याची मागणी त्यांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)