मशीन बंद पडल्याने मतदारांची अडचण; ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड आल्याने तब्बल दीड तास बंद
By रवींद्र चांदेकर | Published: April 26, 2024 03:01 PM2024-04-26T15:01:26+5:302024-04-26T15:03:15+5:30
लोकसभा मतदार संघात अनेक ठिकाणी मशीन बंद पडल्याने मतदानाला विलंब झाला. त्यामुळे मतदारांना ताटकळत थांबावे लागले.
वर्धा : लोकसभा मतदार संघात अनेक ठिकाणी मशीन बंद पडल्याने मतदानाला विलंब झाला. त्यामुळे मतदारांना ताटकळत थांबावे लागले. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील हिंगणघाटमधील रामनगर वॉर्डातील मतदान केंद्र क्रमांक २३१ येथील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड आल्याने तब्बल दीड तास मतदारांना रांगेत उभे राहावे लागले. त्यानंतर मशीन दुरुस्त झाल्यावर मतदारांना हक्क बजावता आला. तसेच नंदोरी येथील केंद्र क्रमांक १७३ मध्ये ईव्हीएम मशीन दहा मिनिटे बंद पडली होती.
झोनल अधिकारी आल्यानंतर ती मशीन पुन्हा सुरळीत चालू करण्यात आली. याशिवाय देवळी विधानसभा क्षेत्रातील देवळीच्या यशवंत कन्या शाळेतील मतदान केंद्र क्रमांक १८५ येथे ४० मिनिट मतदान खोळंबले होते. याच मतदार संघातील चाणकी (कोरडे) येथील मतदान केंद्र क्रमांक ३१४ मध्ये व्हीव्हीपॅट मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आला होता. त्यामुळे याही ठिकाणी सव्वातास मतदान प्रक्रिया रखडली. आधी बॅटरी बदलल्यावरही बिघाड कायम असल्याने मशीनच बदलवून मतदान सुरु करण्यात आले.
आर्वी विधानसभा मतदार संघातील बेनोडा येथील क्रमांक १५६ येथील मशीन बंद पडल्याने मतदान खोळंबले होते. काही वेळानंतर मतदान सुरु झाले. आर्वी येथील आयटीआय कॉलेज व आदिवासी वसतिगृहातील मतदान केंद्रावर मशीन उलट्या लावण्यात आल्या. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. मतदारांनीही याबद्दल रोष व्यक्त केल्यानंतर चूक सुधारण्यात आली.