उलंगवाडी झालेल्यांच्या सर्वेची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 09:56 PM2017-12-14T21:56:39+5:302017-12-14T21:57:03+5:30
जिल्ह्यातील कपाशीवर बोंड अळीचे संकट आले आहे. या अळीमुळे कपाशीच्या उत्पानात कमालीची घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी झाल्याने शासनाकडून पहिले जी’ फार्म भरावयाचा सूचना आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील कपाशीवर बोंड अळीचे संकट आले आहे. या अळीमुळे कपाशीच्या उत्पानात कमालीची घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी झाल्याने शासनाकडून पहिले जी’ फार्म भरावयाचा सूचना आल्या. यात आता सर्व्हेच्या सूचना निर्गमित केल्या आहेत. यानुसार कृषी विभागाकडून काम सुरू आहे. बीटीवर आलेल्या अळ्यांमुळे हवालदिल झालेल्या शेतकºयांनी पिकावर ट्रक्टर चालविला. येथे त्यांनी रबीचा पेरा केला. अशा शेतकऱ्यांच्या शेताच सर्व्हे कसा करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात शासनाने सूचना करण्याची वेळ आली आहे. अशा वेळी काय करावे या विवंचनेत कृषी विभागाचे अधिकारीही पडले आहेत. जिल्ह्यात यंदाच्या खरीपात अडीच लाख हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. यापैकी सुमारे दीड लाख हेक्टरवर कपाशी अळ्यांच्या विळख्यात आल्याचा अंदाज कृषी विभागाच्यावतीने वर्तविला आहे. यामुळे यंदा कपाशीच्या उत्पादनात घट झाली असून कापूस उत्पादकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. परिणामी शेतकºयांकडून आर्थिक मदतीची मागणी आहे.