सिग्नल यंत्रणेला ‘बांधकाम’चा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 11:35 PM2018-02-04T23:35:29+5:302018-02-04T23:36:02+5:30
शहरातील वाहतूक व्यवस्था स्वयंचलित करण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक तथा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात प्रयत्न सुरू आहेत. सिग्नल बसविणे तथा त्यासाठीची यंत्रणा उभारणे ही कामे हाती घेण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील वाहतूक व्यवस्था स्वयंचलित करण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक तथा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात प्रयत्न सुरू आहेत. सिग्नल बसविणे तथा त्यासाठीची यंत्रणा उभारणे ही कामे हाती घेण्यात आली होती. यातील नगर परिषदेने आपली कामे पूर्ण केलीत; पण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविलेली कामे अद्याप पूर्ण झाली नाहीत. यामुळे सिग्नल व्यवस्था सुरू होण्यास अडथळा निर्माण झाला आहे.
वर्धा शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्याकरिता अनेक वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत; पण अद्याप त्यात यश आलेले नाही. तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी काही काळ यशस्वी प्रयत्न करीत वाहतूक स्वयंचलित पद्धतीने सुरू केली. शिवाय अन्य उपक्रमही राबविले. यातून काही काळ वाहतूक सुरळीत झाली होती; पण निरीक्षकाचे स्थानांतरण होताच वाहतुकीची स्थिती जैसे थे झाली. तेव्हापासून शहरातील सिग्नल बंदच आहेत. काही महिन्यांपूर्वी स्वयंचलित वाहतूक दिवे सुरू करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पुढाकार घेतला. सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनीही शहरातील सिग्नल सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरून नगर परिषद, बांधकाम विभाग तथा अन्य काहींशी बोलणी केली. यावरून एका चमूमार्फत शहराची पाहणी करण्यात आली. यानंतर शहरात आर्वी नाका, शिवाजी कॉलनी, बजाज चौक आदी ठिकाणी नवीन सिग्नल बसविण्यात आले. सिग्नल उभारण्याचे काम नगर परिषदेकडे सोपविण्यात आले होते. दिलेल्या मुदतीत पालिका प्रशासनाने सूचनेप्रमाणे सर्व सिग्नल बसवून दिले; पण सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही आपली जबाबदारी पार पाडलेली नाही.
शिवाजी चौक येथील सिग्लनचे खांब दुभाजकांच्या पूढे गेलेले आहेत. यामुळे एखादे वाहन धडकून नवीन खांबांना नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय दुचाकी धारकांचे अपघात नित्याचे झाले आहेत. असाच प्रकार आर्वी नाका चौकातही घडत आहे. बांधकाम विभागाकडे सदर सिग्नलच्या खांबांपर्यंत रस्ता दुभाजक वाढविणे, तेथे आयलाईन तयार करून देणे आदी कामे सोपविण्यात आली होती; पण त्या कामांचा अद्याप मुहूर्तही निघाला नाही. परिणामी, शहरातील सिग्नल आजही केवळ शोभाच वाढवित असल्याचे दिसते. याबाबत वाहतूक नियंत्रक शाखेने जिल्हाधिकाºयांना पत्र दिले असून कार्य कार्यवाही होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रस्त्याच्या मध्यभागी असलेले खांब ठरताहेत धोकादायक
मोठ्या शहरांप्रमाणे वर्धेतील वाहतूक स्वयंचलित दिव्यांद्वारे नियंत्रित करता यावी म्हणून पोलिसांच्या वाहतूक नियंत्रक शाखेने पुढाकार घेत पाठपुरावा केला. यावरून नगर परिषदेने दिव्यांसह सिग्नलचे खांब उभारून दिले. सदर खांब रस्त्यांच्या मध्यभागी उभारण्यात आले आहेत. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या खांबांपर्यंत दुभाजकांची निर्मिती करणे, तेथे चबुतºयाची निर्मिती करणे तथा आयलाईन तयार करून देणे गरजेचे होते. तत्सम जबाबदारी बांधकाम विभागाकडे सोपविण्यातही आली होती; पण अद्याप ही कामे पूर्ण झाली नाही. यामुळे रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेले सिग्नलचे खांब धोकादायक ठरू लागले आहेत. नव्हे तर तेथे अपघातही होत आहेत. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.