खोदकाम उत्तरेकडून; बांधकाम दक्षिणेकडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:06 AM2018-08-30T00:06:53+5:302018-08-30T00:10:12+5:30
शहरातील शिवाजी चौक ते जुनापाणी चौकातील सिमेंटीकरण व रुदीकरणाचे काम प्राकलनाला डावलून होत असल्याचा आरोप आता सत्यात उतरताना दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील शिवाजी चौक ते जुनापाणी चौकातील सिमेंटीकरण व रुदीकरणाचे काम प्राकलनाला डावलून होत असल्याचा आरोप आता सत्यात उतरताना दिसून येत आहे. वाहतुकीच्या दृष्टीकोणातून टप्प्या-टप्प्यात खोदकाम करुन बाधकाम करणे अपेक्षीत असताना कंत्राटदाराने जुनापाणी चौकाकडून बॅक आॅफ इडियापर्यंत खोदकाम करुन ठेवले. पण, बांधकाम करताना बँकेकडून सुरु केल्यामुळे ‘खोदकाम उत्तरेकडून तर बांधकाम दक्षिणेकडून’ असे उफराटे काम कंत्राटदाराने चालविले आहे. यामुळे मागील दोन ते तीन महिन्यापासून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरु आहे.
शिवाजी चौक ते जुनापाणी चौकपर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम करीत असतांना कंत्राटदाराने ५०० मिटर खोदकाम करुन तेवढेच बांधकाम करणे अपेक्षीत आहे. कारण या मार्गावर पाच मंगल कार्यालय, दोन हॉस्पीटल, तीन शाळा तसेच पिपरीच्या अभियांत्रिकी, कृषी आणि आर्टस् महाविद्यालयात जाण्यासाठीही हा एकमेव मार्ग आहे. आर्वीकडे जाणारा हा एकमेव मार्ग असल्याने या रस्त्याने चांगलीच वर्दळ असते. या वाहतुकीचा विचार न करता कंत्राटदाराने जुनापाणी चौकापासून तर बँक आॅफ इंडियापर्यंत एकाबाजुने जवळपास दीड कि़मी.चा रस्ता खोदून ठेवला आहे. ज्या दिशेने खोदकाम केले तसेच तातडीने बांधकाम करणे गरजेचे आहे; पण बांधकाम विरुद्ध दिशेने सुरु केल्यामुळे वाहनचालकांना तसेच या मार्गावरील रहिवाशांना चांगलाच त्रास सहन करवा लागत आहे. या मार्गावर सकाळ-सायंकाळी शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच इतर नागरिकांची वर्दळ असते. सोबतच स्कूल बस, आॅटो व महामंडळाच्या बसेस आणि इतरही वाहनाची गर्दी असते. एका बाजुने खोदलेला रस्ता तर दुसऱ्या बाजूने खड्डेमय रस्ता असून त्यावरुनच मार्ग काढावा लागतो. या अरुंद खड्डेमय रस्त्यावरुन रोजच किरकोळ अपघात होत आहेत. खड्डेमय रस्त्यामुळे वाहनांचेही नुकसान होत असल्याने नागरिकांंमध्ये तीव्र संंताप व्यक्त होत आहे. बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने कंत्राटदाराचा सुरु असलेला नियोजनशून्य कारभार आता वाहनचालकांच्या जीवावर बेतणार असल्याची ओरड होत आहे.
पेवर मशीनऐवजी जेसीबीनेच काम
शिवाजी चौक ते जुनापाणी चौकापर्यंत रस्त्याच्या बांधकामाकरिता शासनाकडून २७ कोटींचा निधी मिळाला आहे. या रस्त्याचा कंत्राट जे. पी. कंस्ट्रक्शनला दिला आहे. मात्र, प्रत्यक्ष काम माया तिवारी यांच्यामार्फत सुरु असल्याचे दिसून येते. या रस्त्यावर डीएलसी (ड्राय लींक काँॅक्रीट) करताना पेवर मशीनचा वापर करणे गरजेचे आहे;पण कंत्राटदारांने पैसे वाचविण्यासाठी जेसीबी मशीनचा वापर सुरु केला आहे. आताही डीएलसी टाकतांना जेसीबीच वापरली जात असल्यामुळे रस्त्याची गुणवत्ता ढासळत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याच्या सखोल चौकशीची मागणी आहे.
तक्रारकर्त्यांना डावलून केली चौकशी
नागरिकाच्या तक्रारीवरुन पिपरीचे सरपंच अजय गौळकर यांनी सदस्यांसह रस्त्याची चौकशी केली असता प्राकलनानुसार कमी डीएलसीचा थर आढळून आला होता. त्यामुळे त्यांंनी या रस्त्याची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर बांधकाम विभागाकडून चुपचाप चौकशी करुन कंत्राटदाराला दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार कंत्राटदाराने कामही सुरु केले. यात बांधकाम विभागाने तक्रारकर्त्याना डावलून चौक शी केली. त्यामुळे या बांधकामात नक्कीच गौडबंगाल असून त्याला बांधकाम विभाग झाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे.
या रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी सार्वजनिक बाधकाम विभागाकडे करण्यात आली; पण बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी विश्वासात न घेताच चौकशी केल्याची माहिती आहे. त्यानुसार दुरुस्तीचे कामही सुरु करण्यात आले. बांधकाम विभागाचे अधिकारी दिशाभूल करुन कंत्राटदाराची पाठराखण करीत आहेत. या रस्त्याचे उर्वरीत काम पेवर मशीननेच करण्यात यावे. अन्यथा आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही.
- अजय गौळकर, सरपंच, पिपरी(मेघे).
सरपंचांच्या तक्रारीनुसार एकदा कामाची पाहणी करण्यात आली. त्यात आढळलेल्या त्रुटीनुसार कंत्राटदाराला सूचना केल्यानंतर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. पुन्हा एकदा या रस्त्याची चौकशी केली जाईल.
- संंजय मंंत्री, उप-अभियंता, सा.बां.विभाग वर्धा.