दिघेंच्या राजीनाम्याचे कनेक्शन जि.प.तील भ्रष्टाचाराशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 09:33 PM2019-01-31T21:33:55+5:302019-01-31T21:34:20+5:30
भारतीय जनता पक्षाच्या सुरूवातीच्या काळातील निष्ठावंत शिलेदार अशी ज्यांची ओळख आहे, त्या किशोर दिघे यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. दिघे यांच्या या राजीनाम्याचे कनेक्शन भारतीय पक्षाची सत्ता असलेल्या वर्धा जिल्हा परिषदेच्या गैरकारभाराशी असल्याचे जवळपास उघड झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भारतीय जनता पक्षाच्या सुरूवातीच्या काळातील निष्ठावंत शिलेदार अशी ज्यांची ओळख आहे, त्या किशोर दिघे यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. दिघे यांच्या या राजीनाम्याचे कनेक्शन भारतीय पक्षाची सत्ता असलेल्या वर्धा जिल्हा परिषदेच्या गैरकारभाराशी असल्याचे जवळपास उघड झाले आहे.
भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष दिवंगत भगवानजी आंबटकर यांनी किशोर दिघे यांना राजकारणात आणले होते. मागील २८ ते ३० वर्षांपासून दिघे हे भारतीय जनता पक्षात सक्रिय आहेत. एवढेच नव्हे, तर हिंगणघाट मतदारसंघाचा ते एक मोठा आधार राहिले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी या भागात भारतीय जनता पक्ष वाढविण्याचा मोठा प्रयत्न केला. दिघे गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून ‘विपुल’ प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा थेट आरोपच दिघे यांनी केला होता. या दृष्टिकोनातून त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावर अनेकवेळा पुराव्यासह आपली बाजू मांडली. पक्षाचे नाव खराब करणाºया लोकांचे काही तरी करा, अशी त्यांची भूमिका होती. मात्र, याबाबत पक्षाच्या स्तरावरून प्रचंड उदासीनता बाळगण्यात आल्याने अखेर नाराजी असलेल्या दिघे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. उल्लेखनीय बाब म्हणजे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील असल्याने दिघे यांची मोठी अडचण झाली होती. सर्वसामान्य लोक जिल्हा परिषदेच्या भ्रष्टाचाराकडे बोट दाखवित होते. त्यामुळे अखेरीस पक्षाच्या पदाचा त्याग करण्याची भूमिका घेतली, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यासंदर्भात आॅडिओ क्लिपही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. त्यातील संभाषण हे दिघेंचे असल्याची या भागात चर्चा आहे. दिघे यांनी आपल्या राजीनामा जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांच्याकडे पाठविला आहे. यासोबतच पक्षाचे संघटन मंत्री विदर्भ डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. रामदास आंबटकर यांच्याकडेही पाठविला आहे. पक्ष या प्रकरणात काय भूमिका घेतो, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.