देशाची वाटचाल महासत्ता बनण्याच्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:11 AM2018-04-21T00:11:37+5:302018-04-21T00:11:37+5:30
गत तीन वर्षांत देशभरातील पाच कोटी लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस सिलिंडर वितरित करण्यात आले आहे. यंदा नव्याने तीन कोटी लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : गत तीन वर्षांत देशभरातील पाच कोटी लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस सिलिंडर वितरित करण्यात आले आहे. यंदा नव्याने तीन कोटी लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. समाजातील दुर्बल घटकाला सन्मानाने जगता यावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विविध उपक्रम राबवित आहेत. सध्या देशाची वाटचाल महासत्ता बनण्याच्या दिशेने सुरू आहे, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.
उज्वला दिवसानिमित्त आयोजित गॅस सिलिंडर वितरण समारंभात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर इंडियन गॅस एजन्सीचे डीजीएम ए.पी. संकलेचा, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, पं. स. उपसभापती किशोर गव्हाळकर, न. प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, नगरसेवक नंदू वैद्य, एजन्सीचे संचालक रमेश जुगनाके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
स्थानिक आर. गॅस इंडियनच्यावतीने
आयोजित कार्यक्रमात खा. तडस पुढे म्हणाले, उज्ज्वला गॅस सोबतच प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून समाजातील बेघरांना न्याय दिला जात आहे. या योजनेतून देवळीत ८५० लाभार्थ्यांची घरे मंजूर करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही अशांना जागा विकत घेण्यासाठी ५० हजार रूपये किंवा अशांची निवासी कॉलनी उभारून घरे बांधून दिली जाणार आहे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष बकाने म्हणाले की, सरकारच्या ग्राम स्वराज्य योजनेंतर्गत येत्या पंधरा दिवसात आठ कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. उज्ज्वला दिवस हा त्याच कार्यक्रमाचा एक भाग आहे, असे सांगितले. या योजनेंतर्गत मिळणारी गॅस कर्ज स्वरूपात असून या पैशाचा भरणा लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सबसीडीतून कपात केला जाणार आहे. सहा कनेक्शन नंतर सातव्या कनेक्शनपासून पैशाची कपात केली जाणार असल्याचेही यावेळी बकाने यांनी स्पष्ट केले. ही योजना जागतिक स्तरावर क्रांतीकारक ठरली असल्याचे सकलेचा यांनी सांगितले.
येथील आर गॅस एजन्सीच्यावतीने यापूर्वी ५२७ व कार्यक्रमाचे दिवशी १० लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वितरण करण्यात आले. यामध्ये पळसगाव येथील चिंधा उईके, वेणू साखरकर, अंजना फुपटे, बाभुळगावकर (खोसे) येथील सुनंदा बोबडे व संगीता बोबडे, देवळी येथील मैना पचारे व सुवर्णा जयपूरकर तसेच दुर्गा राऊत (रत्नापूर) व वच्छला शिंदे (आपटी) व बेबी आत्राम (फत्तेपूर) याचा समावेश आहे. कार्यक्रमाचे संचालन भाजपाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल चोपडा यांनी केले.