वर्धा कृउबाच्या संचालकांनी केला राज्यातील सात बाजार समित्यांचा दौरा
By admin | Published: January 12, 2017 12:37 AM2017-01-12T00:37:21+5:302017-01-12T00:37:21+5:30
स्थानिक कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी राज्यातील सात कृषि उत्पन्न बाजार समितींना नुकतीच भेट देऊन
नवीन भाजीबाजारामुळे शेतकऱ्यांना मिळणार प्राथमिक सुविधा
वर्धा : स्थानिक कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी राज्यातील सात कृषि उत्पन्न बाजार समितींना नुकतीच भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. सातही कृषि उत्पन्न बाजार समितींमधील सकारात्मक बदल व शेतकरी हितार्थ घेण्यात आलेले निर्णय यावेळी संचालकांनी जाणून घेतले. वर्धेत अत्याधूनिक असा वर्धेत नवीन भाजीबाजार तयार करण्यात येणार आहे. भेट देण्यात आलेल्या कृउबांनी शेतकऱ्यांना दिलेल्या सुविधेचे येथे अनुकरण करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवीन भाजीबाजारामुळे चांगल्या प्रतीच्या प्राथमिक सुविधा लवकरच मिळणार आहे.
वर्धा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी नगर, बारामती, जळोची (उपबाजार), इंदापूर, फलटन, राजगुरुनगर (खेड), चाकण (उपबाजार) या ठिकाणी भेट देऊन येथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. संचालकांनी अत्याधुनिक पद्धतीने बांधलेल्या भाजीबाजार, धान्य बाजार, गुरांचा बाजार, शितगृहे, प्रक्रिया केंद्रे आदींचीही माहिती जाणून घेतली. यावेळी संचालकांनी त्या-त्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती व संचालकांशी विविध विषयावर चर्चा केली. याप्रसंगी अडत खरेदीदाराकडे गेल्यावर बाजार समितीच्या व्यवहारावर काय परिणाम झाला तसेच भाजीबाजार नियमन मुक्तीबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. सदर उपक्रमात वर्धा कृउबाचे सभापती श्याम कार्लेकर, संचालक विजय बंडेवार, अरविंद भुसारी, प्रकाश पाटील, दत्ता महाजन, शरद झोड, मुकेश अळसपुरे, भुषण झाडे, दिनेश गायकवाड, गंगाधर डाखोळे, सुरेशसिंग मेहेर, शामल मरोठी, सचिव समीर पेंडके आदींचा सहभाग होता.(प्रतिनिधी)
दोन कृउबाचे अवलोकन करून तयार होईल नवीन भाजीबाजार
नुकतीच राज्यातील सात कृउबांना वर्धा कृउबाच्या संचालकांनी भेट दिली. सातही कृउबांमधील सुविधांचा तुलनात्मक विचार केला असता बारामती कृउबाला संचालकांनी प्रथम पसंती दर्शविली. तर द्वितीय पसंती नगर कृउबाला संचालकांनी दिली. दोन्ही कृउबाचे अवलोकन करून वर्धेतील नवीन भाजी बाजार तयार करण्यात येणार आहे. सदर अत्याधुनिक पद्धतीच्या भाजीबाजारामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे वर्धा कृउबाचे सभापती श्याम कार्लेकर यांनी कळविले आहे.