आठवडाभर चालणार जिल्ह्यात ‘गंदगीमुक्त गाव’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 05:00 AM2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:00:11+5:30
सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून नागरिकांमध्ये वैयक्तिक, सार्वजनिक स्वच्छतेबाबत मत परिवर्तन घडवून आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने ८ ते १५ ऑगस्ट या कालावधीत गंदगी मुक्त गाव अभियान राबविण्यात येत आहे. या कालावधीत विविध उपक्रम जिल्ह्यातील विविध गावांत राबविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी बदल घडवून आणण्यासाठी तसेच आरोग्यदायी सवयी वाढविण्यासाठी सक्रीय सहभाग नोंदविण्याबाबत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ८ ते १५ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात ‘गंदगीमुक्त गाव’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गाखरे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सनि ओम्बासे यांनी केले आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून नागरिकांमध्ये वैयक्तिक, सार्वजनिक स्वच्छतेबाबत मत परिवर्तन घडवून आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने ८ ते १५ ऑगस्ट या कालावधीत गंदगी मुक्त गाव अभियान राबविण्यात येत आहे. या कालावधीत विविध उपक्रम जिल्ह्यातील विविध गावांत राबविण्यात येत आहे. या अभियानात सरपंच व ग्रामसेवक तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचे आवाहन आहे. गावातील सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यासोबत ई-संवाद साधून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. ९ रोजी गावातील एकचवेळा वापरून फेकण्यात आलेले प्लास्टिक गोळा करुन त्याचे वर्गीकरण करण्यात आले. १० रोजी ग्रामपंचायती अंतर्गत इमारतीची स्वच्छता करणे, स्वच्छतेबाबत लोकशिक्षण देण्यासाठी मोबाईल अकादमीचा प्रारंभ करणे, शाश्वत स्वच्छतेबाबत शासनातर्फे दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर अभिप्राय देणे, ११ रोजी कोविड-१९च्या अनुषंगाने आवश्यक दक्षता घेऊन हागणदारीमुक्त शाश्वता व संपूर्ण स्वच्छतेबाबत उपलब्ध करुन दिलेले संदेश गावातील भिंतींवर रंगविणे, १२ रोजी श्रमदानातून वृक्षारोपण करणे, १३ रोजी ‘गंदगीमुक्त माझा गाव’ या विषयावर ऑनलाईन चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १४ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राची स्वच्छता व निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट रोजी हागणदारीमुक्त आणि अधिकारांबाबत ग्रामपंचायतीत घोषणा करणे, आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. गावातील स्वच्छता अबाधित राहावी, वैयक्तिक शौचालयाच्या वापरासह परिसर स्वच्छ ठेवल्यास नागरिकांचे आरोग्यमान उंचावेल यासाठी हे अभियान उपयोगी पडणार आहे. यासाठी ग्रामस्तरावरील सरपंच, ग्रामसेवक, नागरिकांनी या अभियानात सक्रीय सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. कोविड-१९च्या प्रादुर्भावाचा विचार करता यासंबंधीच्या सूचनांचे पालन करुन उपक्रमांचे नियोजन करावे, व अंमलबजावणी करावी, असे आवाहन ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून करण्यात आले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पणीपुरवठा स्वच्छता विभागाची संपूर्ण यंत्रणा करीत आहे.
स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा
गावातील स्वच्छता अबाधित राहण्यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक गावांत स्वच्छ भारत अभियान राबविण्याबाबतचे निर्देश दिले होते. मात्र, अजूनही गावासह शहरात कचऱ्याची समस्या जैसे थेच आहे. याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. त्यामुळे गंदगी मुक्त अभियान राबवून काय फायदा होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामसेवक, सरपंचांशी ई-संवाद
जिल्ह्यात गंदगी मुक्त गाव अभिायान राबविण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे ई-बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना अभियानाबाबत ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अभिायान राबविण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या.