एकाच राष्ट्रीयकृत बँकेमुळे खातेदारांची गैरसोय
By admin | Published: December 2, 2015 02:23 AM2015-12-02T02:23:37+5:302015-12-02T02:23:37+5:30
येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेला गावातील खातेदारासह परिसरातील गावेही जोडण्यात आली आहे.
शाखा विस्ताराची मागणी : आर्थिक व्यवहारासाठी लागतात ग्राहकांच्या रांगा
वायगाव (नि.) : येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेला गावातील खातेदारासह परिसरातील गावेही जोडण्यात आली आहे. यामुळे खातेदारांच्या संख्येत वाढ झाली असल्याने आर्थिक व्यवहार करताना ही बाब अडचणीची ठरत आहे. येथील शाखेचा विस्तार करण्याची मागणी असून येथे अन्य राष्ट्रीयकृत बँकेची शाखा देण्याची मागणी होत आहे.
वायगाव ही बाजारपेठ असल्याने परिसरातील १८ ते २० गावातील ग्रामस्थ येथे खरेदीकरिता येतात. शिवाय बँकेचे व्यवहार करण्याकरिता ग्रामस्थांना येथे यावे लागते. मात्र येथील शाखेचा विस्तार केला नसल्याने ग्रामस्थांही गैरसोय होत आहे. येथील शाखेतून परिसरातील २० गावांचे कामकाज होत आहे. गावात एकच बँक असल्याने ग्राहकांना १२ किमी अंतराचा पल्ला पूर्ण करुन व्यवहार पूर्ण करावे लागतात. यामुळे वयोवृद्ध खातेदारासह व्यावसायिक व शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. वायगाव येथेच अन्य राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
वर्धा तालुक्यातील वायगाव येथे शाळा, पोलीस चौकी, महसूल मंडळ, तलाठी, पशु वैद्यकीय रूग्णालय, खासगी दवाखाने, आठवडी बाजार अशा सुविधा असल्याने परिसरातील ग्रामस्थ येथेच येतात. येथे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वास्तव्य आहे. येथे राष्ट्रीयकृत बँक एकच असल्याने ग्राहकांची संख्या वाढली आहे. या एकमेव शाखेमुळे व्यापारी व नागरिकांना ताटकळत राहावे लागते. कधीकधी तर बँकेचे व्यवहार करण्यासाठी वर्धा येथे जावे लागते. परिसरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वायगाव येथे दुसरी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करणे गरजेचे ठरत आहे. अन्यथा येथील राष्ट्रीयकृत बँक शाखेचा विस्तार करण्याची मागणी आहे. येथील कार्यालयासमोर आर्थिक व्यवहार करताना रांगा लागतात. यात लिंक फेल झाल्यास बराच वेळ ताटकळावे लागते. पैसे काढण्यासाठी संप्प्रण दिवस खर्ची घालावा लागतो. यामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथे शाखा देणे गरजेचे ठरत आहे.(वार्ताहर)