भाजप सरकारकडून युवकांच्या पदरात पडली निराशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 11:47 PM2018-07-03T23:47:50+5:302018-07-03T23:48:18+5:30
दरवर्षी युवकांना एक कोटी रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे आमिष देत भाजपने सत्ता मिळविली. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटून ही युवकांच्या हाताला काम मिळाले नाही. एक कोटी तर दुरच पाच लाख युवकांना सुध्दा या शासनाने रोजगार उपलब्ध करून दिला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दरवर्षी युवकांना एक कोटी रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे आमिष देत भाजपने सत्ता मिळविली. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटून ही युवकांच्या हाताला काम मिळाले नाही. एक कोटी तर दुरच पाच लाख युवकांना सुध्दा या शासनाने रोजगार उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे भाजप सरकार कडून युवकांची घोर निराशा झाली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केले.
सेवाग्राम येथील आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर रायुकॉ विदर्भ समन्वयक संग्राम गावंडे, राकॉ जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, उपाध्यक्ष प्रा. खलील खतीब, महिला अध्यक्ष शरयु वांदिले, माजी रायुकॉ जिल्हाध्य संदीप किटे, रायुका जिल्हाध्यक्ष राहुल घोडे उपस्थित होते. कोते म्हणाले की, युवक वणवण फिरतो आहे. मात्र त्याचा हाताला काम नसल्याने निराशेच्या गर्तेत जातो आहे. शासन मात्र आपल्या जाहिराती करण्यात मश्गुल आहे. युवकांच्या हिताचे कुठलेही निर्णय या चार वर्षात घेतले नाही. युवकांची चौफेर निराशा होते आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही. युवकांच्या हिताचे निर्णय न घेतल्यास शासनाला स्वस्थ बसू देणार नाही. असा इशारा त्यांनी दिला. एक बुथ पंधरा युथ असे धोरण पक्षाने तयार केले असून बुथ समिती स्थापन करण्यावर युवकांनी लक्ष केंद्रीत केले पाहिजे. युवकांच्या जास्तीत जास्त शाखा स्थापन करून संघटनेची बांधणी करणे गरजेचे आहे. जिल्ह्याच्या आठही तालुक्यात शाखा स्थापन करणे, बुथ कमिट्या तयार करणे हे कार्य येत्या दोन ते तीन महिन्यात पदाधिकाऱ्यांनी करावे अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. यावेळी संग्राम गावंडे यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी करून युवक हा पक्षाचा महत्वाचा भाग असल्याचे सांगितले. चांगले युवक पक्षाच्या प्रवाहात सामील झाले पाहिजे असे मत गावंडे यांनी व्यक्त केले. तर अध्यक्षीय भाषणात सुनिल राऊत यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. वेळोवेळी शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची भूमिका पक्ष घेत असून विविध आंदोलन व निवेदनाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या मांडण्यात येत असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमदरम्यान वर्धेत प्रथम आगमन निमित्य संग्राम कोते पाटील यांचा चरखा व सुतमाला देवून युवक कॉँग्रेस वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. संचालन व आभार प्रा. खलील खतीब यांनी केले. कार्यक्रमाला अंबादास वानखेडे, अशोक निस्ताणे, संदेश किटे, अर्चित निघडे, अजित ठाकरे, शुभम झाडे, सागर शिंदे, सुयोग बिरे, नयन खंगार, मंगेश गावंडे, किशोर झगडकर, प्रणय राऊत, विनय मुन, मोहन काळे, संकेत निस्ताणे, विक्की खडसे, इन्जमाम खतीब व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सारेच घटक नाराज
देशात भाजपसरकारची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने सुरू झाली आहे. या सरकारपासून शेतकरी, शेतमजूर, गृहिणी, युवक, विद्यार्थी, कामगार, उद्योजक, नौकरदार हे सारेच घटक नाराज आहेत. कॉँग्रेस, राकॉँच्या सरकारच्या काळातील योजनाच राबविल्या जात असून त्याचे केवळ मार्केटींग सुरू आहे. असा टोलाही संग्राम कोते पाटील यांनी लगावला.