जखमींवरील उपचारात व आरोपीच्या वैद्यकीय तपासणीत खोडा
By admin | Published: July 6, 2016 02:25 AM2016-07-06T02:25:44+5:302016-07-06T02:25:44+5:30
खरांगणा आणि आंजी (मोठी) प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर डॉक्टर राहत नसल्याने किरकोळ व गंभीर जखमींवर उपचार होत नाही.
पोलीस यंत्रणा हतबल : डॉक्टर अवैध रजेवर
आकोली : खरांगणा आणि आंजी (मोठी) प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर डॉक्टर राहत नसल्याने किरकोळ व गंभीर जखमींवर उपचार होत नाही. यामुळे वैद्यकीय तपासणीत अडथळा निर्माण होतो. सदर आरोपींना सामान्य रुग्णालय वर्धा येथे नेल्यास डॉक्टर वैद्यकीय तपासणी करून देण्यास नकार देतात. यामुळे पोलीस यंत्रणा हतबल झाली आहे.
वर्धा-आर्वी व खरांगणा-कारंजा मार्गावर नेहमी अपघात होतात. अपघातग्रस्त रुग्णांना त्वरित व वेळीच उपचार मिळणे अत्यावश्यक असते; पण खरांगणा येथे रात्रपाळीत कुणी राहत नाही. शिवाय दिवसाही मिटींग वा अन्य कारणाने डॉक्टर गैरहजर असतात. परिणामी, जखमींना आंजी (मोठी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले जाते; पण तेथील दोन्ही डॉक्टर अवैध रजेवर आहेत. प्रभारीवर इतर ठिकाणचा भार असल्याने दवाखाना नेहमी डॉक्टरविना असतो. यात जखमींवर त्वरित उपचार होत नसल्याची ओरड जनता व पोलीस यंत्रणेकडे होत आहे. भांडणातील जखमी फिर्यादी व आरोपींची वैद्यकीय तपासणी करणे कायद्याने बंधनकारक आहे. वैद्यकीय तपासणी शिवाय पूढील कायदेशीर कार्यवाही करणे अडचणीचे असते.
खरांगणा व आंजी (मोठी) येथील दवाखान्यात डॉक्टर गैरहजर राहत असल्याने वैद्यकीय तपासणीसाठी संबंधितांना सामान्य रुग्णालयात पोलीस घेऊन जातात; पण तेथील डॉक्टर ज्या हद्दीत घटना घडली, तेथेच वैद्यकीय तपासणी करा, आम्ही करून देणार नाही, अशी भूमिका घेतात. डॉक्टरांची नकारघंटा कायदेशीर योग्य असली तरी पोलिसांच्या कार्यवाहीत अडचणी निर्माण करणारी ठरते.
पोलिसांनी जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेत त्रासाबद्दल माहिती दिली असता डॉक्टरांचा नकार योग्य असल्याचे त्यांनी बोलून दाखविल्याचे पीएसआय विनोद राऊत यांनी सांगितले. यामुळे पोलिसांनी जखमींना घेऊन कुठे जावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.(वार्ताहर)