पाटचऱ्या नादुरूस्त, शेती कोरडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 10:11 PM2017-12-05T22:11:47+5:302017-12-05T22:12:04+5:30
खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी पिकातून खर्चही निघत नसल्याने न खचता शेतकऱ्यांनी रबी हंगामाकडे लक्ष दिले आहे;....
आॅनलाईन लोकमत
वर्धा : खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी पिकातून खर्चही निघत नसल्याने न खचता शेतकऱ्यांनी रबी हंगामाकडे लक्ष दिले आहे; पण पाटचºयांच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणीच पोहोचत नसल्याची स्थिती आहे. परिणामी, शेतकऱ्यांना अद्याप पेरण्याही आटोपता आल्या नसल्याचे वास्तव आहे. कालवे, उपकालवे, पाटचºया, सायपण यांच्या दुरूस्तीबाबत पाटबंधारे विभाग अत्यंत उदासिन असल्याचेच दिसून येत आहे.
सध्या जिल्ह्यातील प्रकल्पांतून रबी हंगामाकरिता पाणी सोडण्यात आले आहे. उर्ध्व वर्धा, निम्न वर्धा, बोरधरण, महाकाली आदी प्रकल्पांतून कालव्यांच्या माध्यमातून पाणी दिले आहे; पण दयनिय कालवे, उपकालवे व पाटचºयांमुळे ते पाणी अद्यापही शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचलेच नाही. परिणामी, जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप पेरण्याही करता आलेल्या नाहीत. यामुळे रबी हंगामातील पिके तरी शेतकºयांना आधार देणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.
पाटाचे पाणी शेतात कधी पोहोचणार? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल
घोराड - दहा दिवसांपूर्वी बोर प्रकल्पाचे पाणी रबी हंगामाकरिता सोडण्यात आले आहे; पण पाण्याची झुळ-झुळ गती ओलिताकरिता त्रासदायक ठरत आहे. यामुळे शेती कधी तयार होणार आणि पेरणी कधी करावी, असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला आहे.
बोर प्रकल्पाच्या पाण्यावर सेलू व समुद्रपूर तालुक्यातील काही भागाचा रबी हंगाम अवलंबून असतो; पण वेळीच वितरिकांची साफसफाई केली जात नसल्याने शेतात पाणीच पोहोचत नाही. अनेक भागातील सफाई अर्धवट असून ती नावपूरतीच केली. यामुळे वितरिकेद्वारे पाणी कमी सोडले जाते. परिणामी, शेताच्या बांधापर्यंत पाणी पाहिजे त्या प्रमाणात पोहोचत नाही. यात शेतकºयांची आपसातच भांडणे लागत असल्याचे दिसते. ‘पाणी हेच जीवन आहे’ असे म्हटले जाते; पण पाटाच्या पाण्याचे नियोजनच केले जात नाही. यासाठी कर्मचारीही नाही. रोजंदारी कर्मचारी वितरिकेवर दिसत नाहीत. पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. पांदण रस्ते जलमय होतात. नदी, नाल्यांचा प्रवाह वाढला आहे; पण टोकापर्यंत पाणी पोहोचून पेरणी कधी होणार, हा प्रश्न कायम राहत आहे.
पांदण रस्त्यांवर चिखल
सेलू तालुक्यातील कालवे, उपकालवे, पाटचºया, सायपण यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. परिणामी, कालव्यातील पाणी शेतात पोहोचण्याऐवजी पांदण रस्त्याने वाहत असल्याचे दिसून येते. यामुळे अनेक पांदण रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरते. शिवाय शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी शिरत असल्याने त्यांना नुकसान सोसावे लागत असल्याचे चित्र आहे.
कर्मचारीही बेपत्ताच
कालव्यांतील पाणी उपकालवे, वितरिकांमध्ये सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे कायम कर्मचारी नाही. हे काम रोजंदारी कामगारांकडून करून घेतले जाते; पण सेलू तालुक्यात रोजंदारी कर्मचारीही वितरिकांजवळ दिसून येत नसल्याने पाण्याच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह लागले आहे. वरिष्ठांनी हा भोंगळ कारभार दूर करणे गरजेचे झाले आहे.
निम्न वर्धाचे कालवेच अर्धवट
सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी, अमरावती, वर्धा जिल्ह्यातील शेतकºयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून निम्न वर्धा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली; पण २५ ते ३० वर्षांचा कालावधी लोटला असताना या प्रकल्पाची उपयोगिता सिद्ध झालेली नाही. निम्न वर्धा प्रकल्पातील मुख्य डावा कालवाच अद्याप पूर्ण झालेला नाही. अनेक ठिकाणी बांधकाम करण्यात आले तर पुलगाव शहरातील तथा नाचणगाव आणि अन्य ग्रामीण भागातील कालव्याचे काम पूर्ण झालेले नाही. अद्याप कालवाच पूर्ण झाला नाही तर उपकालवे आणि पाटचऱ्यांची निर्मिती कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
परिणामी, या कालव्यात पाणी तर सोडण्यात आले; पण ते आपल्या शेतात पोहोचविण्याकरिता शेतकºयांना कालव्यावरच मोटर पंप बसवावे लागत आहे. हा प्रकार कोल्हापूर (राव), भिडी तथा परिसरातील गावांमध्ये पाहावयास मिळतो. कालवाच पूर्ण झाला नसल्याने उपकालवे, पाटचऱ्यांची निर्मिती पाटबंधारे विभागाकडून कधी केली जाणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. निम्न वर्धा प्रकल्प विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.