विकासाच्या नावावर विनाशाला खतपाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:18 PM2019-09-09T23:18:26+5:302019-09-09T23:18:58+5:30
अनेक महापुरूषांचे तप खर्ची लागले आहे. परंतु सध्या विकासाच्या नावावर विनाशाकडे वाटचाल सुरू आहे. हे समाजाच्या दृष्टीने घातक असल्याने यात बदल घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, कारण ही युवापिढी या देशाचे भवितव्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवी माला माथुर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशाने जो विकास साधला आह, हा काही चमत्कार नाही. त्यासाठी अनेक महापुरूषांचे तप खर्ची लागले आहे. परंतु सध्या विकासाच्या नावावर विनाशाकडे वाटचाल सुरू आहे. हे समाजाच्या दृष्टीने घातक असल्याने यात बदल घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, कारण ही युवापिढी या देशाचे भवितव्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवी माला माथुर यांनी केले.
शिक्षा मंडळद्वारा संचालित श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय, पिपरी (मेघे) येथे तपोधन श्रीकृष्णदास जाजू यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.पुरूषोत्तम कालभूत होते. डॉ.उल्हाज जाजू, उपप्राचार्य प्रा.सुरेश पवार प्रामुख्याने उपस्थित होते. माला माथुर म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास साधावा. या स्पर्धात्मक युगात दुसऱ्याशी स्पर्धा करून वाईट विचारांचा मनात शिरकाव करण्यापेक्षा स्वत:शीच स्पर्धा करा. कालच्यापेक्षा आजचा दिवस कसा चांगला जाईल, याचा प्रयत्न करा. समर्पित भावनेने आपले जीवन व्यथित करा, असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला. तपोधन श्रीकृष्णदास जाजू हे माझे आजोबा होते. यावेळी डॉ.उल्हास जाजू यांनीसुद्धा मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात डॉ.पुरूषोत्तम कालभूत यांनी तपोधन जाजू यांच्या कार्याचा वसा घेण्याचे आवाहन केले. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ यानुसार आपले कार्य असले पाहिजे. महात्मा गांधी आणि तपोधन जाजू यांचे कार्य असे होते. महात्मांच्या विचारावरच ते चालले, कारण त्यांचे विचार मार्गदर्शक आहेत. याच विचारांच्या बळामुळे आपण यशस्वी होऊ शकतो, असेही डॉ.कालभूत म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक प्रा. मिलिंद माने यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन प्रा. सलीम शेख यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.