तंबाखू नियंत्रण कार्यक्रमानंतरही शासकीय कार्यालयात अनियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 09:38 PM2018-09-21T21:38:15+5:302018-09-21T21:39:55+5:30
सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण, विनियमन) अधिनियम २००३ अंतर्गत तंबाखू नियंत्रण कक्षाने मागील तीन वर्षात २८७ जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ५३ हजार ९४० रुपयाचा दंड वसूल केला आहे.
आनंद इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण, विनियमन) अधिनियम २००३ अंतर्गत तंबाखू नियंत्रण कक्षाने मागील तीन वर्षात २८७ जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ५३ हजार ९४० रुपयाचा दंड वसूल केला आहे. विशेषत: या कारवाईला शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भुर्दंड सहन करावा लागला. तरीही शासकीय कार्यालयातील भिंतीवरच्या पिचकाऱ्या तंबाखू अनियंत्रण कार्यक्रमाची साक्ष देत आहेत.
नागरिकांच्या सुदृढ आरोग्याचा विचार करुन तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ्याच्या उत्पादनासह सेवनावर बंदी घातली आहे. यावर नियंत्रण मिळविण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने तंबाखू नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. या कक्षाच्यामाध्यमातून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. सन २०१६-१७ पासून तर यावर्षीच्या आॅगस्टपर्यंत तंबाखू नियंत्रण कक्षाने विविध शासकीय कार्यालयासह सार्वजनिक ठिकाणी तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाºयाविरुध्द कारवाई करुन दंड ठोठावला. सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण, विनियमन) अधिनियम २००३ अंतर्गत कलम ४, कलम ५ , कलम ६ (अ) व कलम ६ (ब) नुसार कारवाई करुन ५३ हजार ९४० रुपयाचा दंड वसूल केला आहे. विशेषत: जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील तब्बल शंभरावर कर्मचाºयांविरुध्द कारवाई करुन त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे. पण, कायद्यामध्ये केवळ दोनशे रुपयापर्यंतच्याच दंडाचे प्रावधान असल्याने शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वागणूकीत सुधारणा झालेली दिसून येत नाही. कार्यालयाच्या भिंतीवर ‘मनाई’ चे फलक लावले असतानाही त्याच फलकाखाली भिंती रंगलेल्या दिसून येत आहे. त्यामुळे तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाला शासकीय कर्मचाऱ्यांकडून हरताळ फासल्याचे चित्र पहावयास मिळते.
कलमांची थोडक्यात माहिती
कोटपा २००३ अंतर्गत कलम ४, कलम ५ , कलम ६ (अ) व कलम ६ (ब) नुसार कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये कलम-४ अन्वये सार्वजनिक ठिकाणी सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करण्यावर बंदी, कलम-५ अन्वये या पदार्थांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातीवर बंदी, कलम ६ (अ) अन्वये १८ वर्षाखालील मुलांना या पदार्थाच्या विक्री करण्यावर बंदी तर कलम ६ (ब) अन्वये शाळेसमोरील १०० यार्ड परिसरात तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
समुद्रपूर तहसील कार्यालयातून सर्वाधिक दंड वसूल
तंबाखू नियंत्रण कक्षाने मागील तीन वर्षापासून कारवाईचा सपाटा सुरु केला आहे. यादरम्यान त्यांनी विविध कलमान्वये कार्यवाही करुन दंडही वसूल केला.परिणामी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर काही प्रमाणात आळा बसला.पण, शौकाची माती होऊ न देणारे आपला चोरटा मार्ग स्विकारतच आहे. या कक्षाने विविध शासकीय कार्यालयाकडे जबाबदारी सोपविली होती. त्यानूसार आतापर्यंत शासकीय रुग्णालयाने त्यांच्या परिसरात ४९ जणांवर कार्यवाही क रुन त्यांच्याकडून ८ हजार १५० रुपये, अन्न व औषधी प्रशासनाने ८९ जणावर कार्यवाही करुन १५ हजार ८०० रुपये, तहसील कार्यालय समुद्रपूरने ९६ जणांवर कार्यवाही करुन १९ हजार २०० रुपये, कोषागार कार्यालयाने ५ जणांवर कार्यवाही करुन १ हजार रुपये तर जिल्हा माहिती कार्यालयाने एकावर कार्यवाही के ली आहे.