पालकमंत्र्यांच्या कीट मनमर्जीतील व्यक्तींना वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 05:00 AM2020-04-28T05:00:00+5:302020-04-28T05:00:48+5:30
कोरोनाला रोखण्यासाठी तीन मे पर्यंत लॉकडाऊन घोषित झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हातावर पोट असलेल्यांसमोर उदरनिर्वाहाचे संकट ओढावल्याने संसाराचा गाडा कसा हाकावा याच विवंचनेत ते आहेत. अशांना मदत करण्यासाठी पालकमंत्री केदार यांनी जीवनावश्यक वस्तूंची कीट देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार त्यांनी म्हसाळा ग्रामपंचायतीला किट न सोपवता मनमर्जीतील कार्यकर्ता पंकज काचोळे याच्याकडे त्यासर्व कीट सोपविल्या. त्यांनी याची माहिती म्हसाळा ग्रामपंचायतीला न देता मनमर्जीतील लाभार्थ्यांना त्या सर्व कीटचे वाटप केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लॉकडाऊन असल्याने हातावर पोट भरणारे, गरजू, गरीबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तूच्या मदतीसाठी पालकमंत्री सुनील केदार यांनी म्हसाळा ग्रामपंचायतींतर्गत गरजू लाभार्थींना मदत किट ग्रामपंचायतीला न देता कार्यकर्त्याकडे दिल्या, कार्यकर्त्याने मनमर्जीतील लोकांना कीट वाटप केल्याने खरे गरजू लाभार्थी मदतीपासून वंचित राहिले आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी तीन मे पर्यंत लॉकडाऊन घोषित झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हातावर पोट असलेल्यांसमोर उदरनिर्वाहाचे संकट ओढावल्याने संसाराचा गाडा कसा हाकावा याच विवंचनेत ते आहेत. अशांना मदत करण्यासाठी पालकमंत्री केदार यांनी जीवनावश्यक वस्तूंची कीट देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार त्यांनी म्हसाळा ग्रामपंचायतीला किट न सोपवता मनमर्जीतील कार्यकर्ता पंकज काचोळे याच्याकडे त्यासर्व कीट सोपविल्या. त्यांनी याची माहिती म्हसाळा ग्रामपंचायतीला न देता मनमर्जीतील लाभार्थ्यांना त्या सर्व कीटचे वाटप केले.
त्यामुळे म्हसाळा ग्रामपंचायत हद्दीत येणारे अनेक गरजू कुटूंब शासकीय मदतीपासून वंचित राहिले आहे. विशेष म्हणजे कोणत्या लाभार्थ्याला किती कीट द्यायच्या त्याची यादीही ग्रा.पं. प्रशासनाकडून त्यांनी मागितली नाही. त्यामुळे खरे लाभार्थी धान्यापासून वंचित राहिल्याची चर्चा म्हसाळा येथील नागरिकांनी केली.
दहेगाव (मि.) येथे ५० लाभार्थी वंचित
वर्धा पंचायत समितींतर्गत येणाऱ्या दहेगाव (मिस्कीन) येथे मोफत रेशन धान्यापासून ५० लाभार्थी वंचित राहिल्याची तक्रार सरपंच चंदा नगराळे यांनी तहसीलदार प्रीती डुडूलकर यांच्याकडे केली आहे. तक्रारीत त्यांनी वंचित लाभार्थ्यांची यादीच तहसीलदारांना पाठविली आहे. तसेच आंबोडा (लूंगे) येथेही ११ लाभार्थी धान्य पुरवठ्यापासून वंचित असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
हिंगणघाटात ५० लाभार्थ्यांचे नाव वगळले
हिंगणघाट नगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेनुसार ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, किरायदार, परप्रांतीय यांना मोफत धान्य वाटप करण्यात येणार होते. वीर भगतसिंग वॉर्डात १०१ लाभार्थ्यांची यादी पाठविली असल्याचे न.प.कर्मचाºयाने सांगितले. पण, प्रत्यक्षात या यादीतील ५० लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आला आहे. बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्त्वात दिलीप कहूरके, मनीष कांबळे यांनी लाभार्थ्यांची नावे का वगळली अशी विचारणा करण्यास गेले असता न.प. अधिकाऱ्यांकडून उडवाउवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे तत्काळ याची दखल घेत वंचितांना धान्यपुरवठा करण्याची मागणी भोला गाठले, विजय फुलझेले, राजेश खानकूरे, किशोर लढे, प्रदीप डोळस यांनी केली आहे.
पालकमंत्र्यांकडून आलेल्या कीट त्यांच्या कार्यकर्त्याने परस्पर उतरविल्या. याची माहिती ग्रामपंचायतीला द्यायला पाहिजे होती. नियमानुसार ग्रा.पं.च्या माध्यमातून लाभार्थ्यांना किटचे वाटप व्हायला पाहिजे होते. पण, तसे झाले नाही. किती कीट आल्या याची यादीही ग्रामपंचायतीला कळविली नाही. परस्पर कीट वाटप झाल्याने खरे लाभार्थी वंचित राहिले.
- संदीप पाटील. सरपंच, म्हसाळा ग्रा.पं..
पालकमंत्र्यांकडून दीडशे किटसोबत लाभार्थ्यांची यादीही आली होती. प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना वेळेनुसार कीट वाटप करण्यात आल्या. कीट प्राप्त होताच म्हसाळा ग्रा.पं.चे सरपंच यांना फोन केला होता. त्यांनी गावात आॅटो फिरवून सर्वांनाच कीट मिळत आहे अशी दवंडी दिल्याने दीडशेच्यावर झालेले लाभार्थी कीटपासून वंचित राहिले.
- पंकज काचोळे, माजी ग्रा.प.सदस्य नालवाडी.