वर्धा-बुटीबोरी रस्त्यावर दुभाजकाची गरज
By admin | Published: June 3, 2017 12:36 AM2017-06-03T00:36:27+5:302017-06-03T00:36:27+5:30
रस्ता खराब असो वा चांगला, जडवाहनांमध्ये ओव्हरटेक करण्याच्या स्पर्धेत वर्धा ते बुटीबोरी मार्गावर आजवर अनेक अपघात झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : रस्ता खराब असो वा चांगला, जडवाहनांमध्ये ओव्हरटेक करण्याच्या स्पर्धेत वर्धा ते बुटीबोरी मार्गावर आजवर अनेक अपघात झाले आहे. भविष्यात या घटना टाळण्यासाठी वर्धा ते बुटीबोरी रस्त्यावर दुभाजकाची निर्मिती करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
वर्धा ते बुटीबोरी हा ४५ किमी अंतराचा रस्ता खड्ड्यांतून जातो. त्यामुळे खड्डे चुकविताना अपघात होतात. या मार्गावर दुभाजक नसल्याने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहन समोरासमोर येऊन अपघात होतो. हाच मार्ग सेलू तालुक्यातील गावांना जोडतो. केळझर, सेलडोह येथूनही मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या कमी अंतराच्या रस्त्यांमुळे या मार्गावर वाहनांची वर्दळ असते.
नागपूर येथून यवतमाळ, पुसद, उमरखेड लांब पल्ल्याचा मार्ग आहे. बुटीबोरी ते वर्धापर्यंत ट्रक, ट्रॅव्हल्स व कार भरधाव पळतात. वाहने ओव्हरटेक करताना समोरील वाहन भरधाव आल्यास धडक होते. येथे दुभाजकाची निर्मिती केली तर अपघाताच्या कमी होईल.
दुचाकी चालकांना अनेकदा मुख्य रस्ता सोडून रस्त्याच्या कडेने वाहन चालवावे लागते. काही भागात रस्ता उंच सखल असतो. रात्रीच्या वेळी तर लख्ख प्रकाशझोमुळे दुचाकी वाहन चालकांना समोरून येणारे वाहन नजरेस पडत नाही. त्यामुळे या मार्गावर अनेक अपघात झाले आहे. रस्ते विकास महामंडळाने लक्ष देत रस्त्यावर दुभाजकाची निर्मिती करण्याची गरज व्यक्त होत आहे.