जिल्ह्यात वाहनांना संचारबंदी; प्रदूषण ‘लॉकडाऊन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 05:00 AM2020-04-04T05:00:00+5:302020-04-04T05:00:22+5:30
मुख्यमंत्र्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी जाहीर केल्यानंतर सर्व वाहनांची चाके जागेवरच थांबली आहेत. जिल्ह्यात प्रत्येक व्यक्तीमागे १ वाहन आहे. यात दुचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. या व सर्वच प्रकारच्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड हवेत मिसळतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी अगोदर जमावबंदी व आता १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा अंमल करण्यात आला आहे. यामुळे सर्व प्रकारची सार्वजनिक आणि खासगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही ठप्प आहे. परिणामी, रस्त्यांवर प्रचंड शुकशुकाट असून एखाद-दोन वाहनेच दृष्टीस पडत आहेत. यामुळे जिल्ह्यातील वायूप्रदूषणाची पातळी झपाट्याने कमी झाली आहे. कोरोनामुळे सर्व नागरिक घरातच असल्याने कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी मदत होत असताना दुसरीकडे काही दिवसांकरिता तरी प्रदूषण कमी झाल्याचे चित्र आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाखांवर आहे. तर नोंदणीकृत वाहनांची संख्या ३ लाख ८ हजार ९६० आहे. याशिवाय सार्वजनिक वाहनांची संख्या वेगळी आहे.
मुख्यमंत्र्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी जाहीर केल्यानंतर सर्व वाहनांची चाके जागेवरच थांबली आहेत. जिल्ह्यात प्रत्येक व्यक्तीमागे १ वाहन आहे. यात दुचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. या व सर्वच प्रकारच्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड हवेत मिसळतो.
तो आता थांबला आहे. त्यामुळे शुद्ध हवेत काही काळ वावरता येणार आहे. कार्बन डायऑक्साईड, सल्फर डाय आॅक्साईड या घातक वायूंचे प्रमाण कमी झाल्याने वातावरण स्वच्छ झाले असून हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढले आहे.
वाहनेच रस्त्यांवरून धावत नसल्याने ध्वनिप्रदूषणालाही आळा बसला आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. वाहनांमुळे होणारे किरकोळ अपघात आणि वादावादीही बंद झाल्याचे चित्र सध्या शहरातच नाही जिल्ह्याभरात पहावयास मिळत आहे.
दुचाकी वाहनांची संख्या अडीच लाखांवर
जिल्ह्यात ३ लाख ८ हजार ९६० नोंदणीकृत सर्व प्रकारची वाहने आहेत. यात मोटर, कार व इतर चारचाकी वाहने २० हजार ८२०, दुचाकींची संख्या २ लाख ५५ हजार १७७ इतकी आहे. ही सर्व वाहने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागीच थांबली असल्याने ध्वनी आणि वायूप्रदूषणात बंदच्या काळापासून घट झाल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबात किमान चार दुचाकी वाहने आहेत. गुढीपाडवा आणि सणोत्सवात वाहनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी आणि नोंदणी होते. यावेळी गुढीपाडवा सणावरही कोरोनाचे सावट होते. परिणामी नवीन दुचाकी, चारचाकी वाहनांची नोंदणी झाली नाही. संचारबंदीमुळे मागील ११ दिवसांपासून वाहतूक ठप्प आहे. यामुळे प्रदूषणात साहजिकच घट झाली आहे. ही पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय चांगली बाब म्हणावी.
-विजय तिराणकर
सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा