यशवंतराव दाते स्मृती पुरस्काराचे वितरण
By Admin | Published: February 4, 2017 12:22 AM2017-02-04T00:22:58+5:302017-02-04T00:22:58+5:30
येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या वतीने साहित्य क्षेत्रातील मानाच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
व्हाया सावरगाव खुर्द कादंबरीला पुरस्कार : सुनीता कावळे व राजेंद्र मुंढे यांचाही सत्कार
वर्धा : येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या वतीने साहित्य क्षेत्रातील मानाच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ८४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि साहित्यिक उत्तम कांबळे यांची उपस्थिती होती. त्यांच्याहस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक डॉ किशोर सानप, अध्यक्ष प्रदीप दाते, कादंबरीकार दिनकर दाभाडे, कथाकार गणेश मतकरी, विनोदी कथाकार किशोर बळी, लेखिका सुचिता खल्लाळ, समीक्षक डॉ मनोज तायडे आणि पुरस्कार समिती संयोजक डॉ. राजेंद्र मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
लेखकाला आपआपली दुनिया तयार करावी लागते. साहित्य हे माणसाला माणसात आणते. साहित्य परिवर्तनाचे साक्षीदार असते. वेदना आणि प्रतिमेचा संगम असतो, साहित्य निर्मिती वेडेपणातून जन्माला येत असते, शहाणपण कायम ठेऊन चांगली कलाकृतीची निमिती होत नसते. यासाठी अस्सल जीवनानुभव घ्यावा लागतो, तोच घेण्यात मराठी साहित्यिक थिटा पडतो आहे असे वाटते, असे प्रतिपादन ८४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले. ते येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या व्यख्यानमालेचे साहित्य आणि समाज याविषयावर २९ वे पुष्प गुंफताना बोलत होते.
यावेळी कांबळे यांच्या हस्ते आद्य कादंबरीकार बाबा पदमनजी साहित्य पुरस्कार बुलडाणा येथील दिनकर दाभाडे यांच्या 'व्हाया सावरगाव खुर्द' या कादंबरीला, शिक्षणमहर्षी बापूराव देशमुख कथासंग्रह पुरस्कार मुंबई येथील गणेश मतकरी यांच्या 'इन्स्टॉलेशन्स' या कथासंग्रहाला, संत भगवानबाबा काव्यसंग्रह पुरस्कार अकोल्याचे कवी श्रीकृष्ण राऊत यांच्या तूको बादशहा या काव्यसंग्रहाला, भावराव शिंगाडे स्मृती विनोदी साहित्य पुरस्कार अकोल्याचे किशोर बळी यांच्या 'धुम्मस' या विनोदी कथासंग्रहाला पाहुण्याच्या हस्ते रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात प्रदान करण्यात आले. अंजनाबाई इंगळे स्मृती स्त्रीवादी साहित्य पुरस्कार नांदेडच्या सुचिता खल्लाळ यांच्या स्त्री कवितेचं भान- काल आणि आज या समीक्षाग्रंथासाठी रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र दिले. हरीश मोकलकर स्मृतीत दिला जाणारा सामाजिक ऋण पुरस्कार यवतमाळचे अॅड. असीम सरोदे यांच्यावतीने त्यांचे बंधू अमित यांनी स्वीकारला.
या प्रसंगी स्थानिक बालसाहित्यिक आणि कादंबरीकार डॉ. सुनीता कावळे यांचा त्यांच्या आजवरच्या साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल आणि प्रा. डॉ. राजेंद्र मुंढे यांचा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून उत्तम कांबळे यांच्या साहित्याचा चिकित्सात्मक अभ्यास याविषयावर आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल शाल श्रीफळ पुष्पगुच्छ मानपत्र व प्रतीकचिन्ह देऊन सन्मान सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक समीक्षक डॉ. किशोर सानप यांनी केले. पुरस्काराविषयी डॉ. राजेंद्र मुंढे यांनी सांगितले. संचालन डॉ. स्मिता वानखेडे यांनी तर आभार प्रदीप दाते यांनी मानले. या कार्यक्रमाला विदभार्तून साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या आयोजनात प्रशांत पनवेलकर, प्रा उल्हास लोहकरे, रंजना दाते, संगीता इंगळे, संजय टोणपे, आकाश दाते, सुरेश वानखेडे, प्रफुल्ल दाते, पंडित देशमुख यांनी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)