स्काऊट गाईड मेळाव्यात जिल्हाधिकाऱ्यांंचा संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 12:02 AM2019-02-06T00:02:54+5:302019-02-06T00:04:02+5:30
स्थानिक एडव्हेंचर हिल्सवर सुरू असलेल्या ३५ व्या स्काऊट गाईडच्या जिल्हा मेळाव्यास जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देवून १२०० स्काऊट गाईड सोबत थेट संवाद साधला. आपली कार्यालयीन कामे आटपून जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी ६ वाजता शिबिर स्थळी भेट दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक एडव्हेंचर हिल्सवर सुरू असलेल्या ३५ व्या स्काऊट गाईडच्या जिल्हा मेळाव्यास जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देवून १२०० स्काऊट गाईड सोबत थेट संवाद साधला.
आपली कार्यालयीन कामे आटपून जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी ६ वाजता शिबिर स्थळी भेट दिली. कोणत्याही प्रकारचा सोपस्कार न स्विकारता मुला-मुलींशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विविध विषयांवर व नैतिक मुल्यांवर जोर देवून भावी आदर्श पिढी निर्माण करण्याकरिता स्काऊटस गाईडसला प्रोत्साहित केले.
यावेळी अध्यक्षस्थानी स्काऊट गाईडचे अध्यक्ष सतीश राऊत होते. तसेच यावेळी जिल्हा आयुक्त कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर, पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव, यशवंत शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. किशोर अहेर, जिल्हा सचिव रामभाऊ बाचले, सुवर्णमाला थेरे, प्राचार्य मदन मोहता, शकुंतला चौधरी, अंबादास वानखेडे, किरण जंगले, संतोष तुरक, प्रा.रविंद्र गुजरकर, भरतकुमार, सोनटक्के, दत्तराज भिष्णूरकर, खुशाल मून, जिल्हा संघटक प्रकाश डाखोळे, वैशाली अवथळे, सुनील खासरे, सतीश इंगोले उपस्थित होते.
मुलांशी संवाद साधतांना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुटखा तंबाखू, धुम्रपान व अल्पवयीन मुलांनी वाहन चालवितांना घ्यावयाची काळजी, यावर मार्गदर्शन केले. पालक व शिक्षक यांच्याशीही संवाद साधून मुलांना खेळामध्ये सहभागी करा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन उर्मिला चौधरी, वैशाली अवथळे यांनी केले तर आभार प्रकाश डाखोळे यांनी मानले.
साहस खेळाचा १२०० स्काऊट गाईडनी आनंद लुटला
जीवनात प्रत्येक पावलावर अडचणी व अडथळे असतात. अडचणींवर जो मात करतो, तोच अपयशावर मात करू शकतो. त्यातुनच अजिंक्य मनोबल निर्माण होते. म्हणून अशा प्रकारचे प्रशिक्षण योग्य वयात मुला-मुलींनी दिले पाहिजे, असे प्रतिपादन स्काऊट गाईडचे अध्यक्ष सतीश राऊत यांनी केले. स्थानिक एडव्हेंचर हिल्सवर सुरू असलेल्या ३५ व्या जिल्हा मेळाव्यात साहस प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी स्काऊट गाईडशी हितगूज साधताना ते बोलत होते. स्काऊट गाईड कार्यालयाच्यावतीने रोव्हर व रेंजर्सनी साहसखेळ प्रकल्प स्काऊटचे जिल्हा आयुक्त कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर, रोव्हर लिडर संतोष तुरक, प्रा. रविंद्र गुजरकर, स्वप्नील शिंगाडे यांच्या नेतृत्वात राबविला. यात जिल्हा मेळाव्यातील १२०० स्काऊट गाईड यांनी अडथळा पार प्रशिक्षणाचा आनंद लुटत. यावेळी प्राचार्य डॉ. सुरेश उपाध्याय, मुख्याध्यापक जयश्री कोटगिलवार, जिल्हा आयुक्त गाईड सुवर्णमाला थेरे, शकुंतला चौधरी व स्काऊट गाईडचे पदाधिकारी, शिक्षकवृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन स्वप्नील मडावी यांनी केले तर आभार विवेक कहाळे यांनी मानले. यशस्वीतेकरिता सर्व रोव्हर्स व रेंजर्सनी सहकार्य केले.