पिंपळझरीच्या नुकसानग्रस्तांची जिल्हाधिकाऱ्यांनी जाणली व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 10:31 PM2018-02-15T22:31:05+5:302018-02-15T22:31:37+5:30
अवकाळी पाऊस व गारपिटीने बेघर झालेल्या पिंपळझरी येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देऊन समस्या जाणुन घेतल्या. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यासह १४ फेब्रुवारीला दिलेल्या भेटीत येथील पीडितांसोबत संवाद साधुन त्यांनी अडचणी जाणून घेतल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : अवकाळी पाऊस व गारपिटीने बेघर झालेल्या पिंपळझरी येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देऊन समस्या जाणुन घेतल्या. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यासह १४ फेब्रुवारीला दिलेल्या भेटीत येथील पीडितांसोबत संवाद साधुन त्यांनी अडचणी जाणून घेतल्या. तसेच पिंपळझरीतील बेघर झालेल्या सर्व कुटुंबांना ‘खास शबरी घरकूल’ योजनेतून घरे बांधून देण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे सांगितले.
मार्च अखेरपर्यंत सर्व पीडित कुटुंबियांना पक्की घरे बांधून देण्याचे आदेश तहसीलदार, नायब तहसीलदार, आर्वी उपविभागीय अधिकारी यांना ग्रामस्थांसमोर दिले. तसेच शेतीच्या नुकसानीचे देखील त्वरित सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. याच दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी रोहणा येथील अविनाश कहाते यांच्या नुकसानग्रस्त शेताला भेट दिली. कहाते यांना प्रगत व तांत्रिक शेतीसाठी स्व. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार शासनाने प्रदान केला आहे. त्यांची पिंपळझरी नजीक २२ एकर शेती असून त्या शेतीत शेडनेट व ठिबक सिंचनाची सोय केली आहे. तिखट मिरची, सिमला मिरची, कोबी, हरभरा, कापूस व हळदीचे पीक होते. हळद जमिनीत असल्याने ते पीक सोडून इतर सर्व पिके जमीनदोस्त झालीआहे. शिवाय शेडनेट देखील नेस्तनाबुत झाले. नैसर्गिक आपत्तीत कहाते यांचे २० ते २५ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीत वाईचे माजी सरपंच गणेश गजकेश्वर, सरपंच चंदा दौलत कुंडी, संजय बोंदरे, मयूर बुरघाटे, शेतकरी अविनाश कहाते यांच्यासह गावकऱ्यांनी समस्या मांडल्या.
संकटाचा सामना करण्यासाठी दिले भावनिक बळ
पिंपळझरी गावाला गारपिटीचा आणि वादळाचा चांगलाच तडाखा बसला. येथील बहुतांश नागरिक बेघर झाले. लोकप्रतिनिधी तसेच शासकीय स्तरावर अधिकारी वर्गाने गावाला भेट देऊन ग्रामस्थांचे सांत्वन केले. तसेच त्यांना लागणारी मदत तात्काळ पुरविली.
पिंपळझरीतील बेघर झालेल्या सर्व कुटुंबांना ‘खास शबरी घरकुल’ योजनेतून घरे बांधून देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पीडितांना मदतीचे आश्वासन देवून भावनिक बळ दिले.