जिल्हा दुष्काळग्रस्त पण, प्रशासनाच्या लेखी सुकाळच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 11:19 AM2020-11-04T11:19:28+5:302020-11-04T11:23:36+5:30
Government Wardha News सततचा पाऊस आणि रोगाच्या प्रकोपामुळे यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळात होरपळ होत असतानाही प्रशासनाच्या लेखी सुकाळ असल्याचे चित्र सुधारित आणेवारीवरुन अधोरेखित करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सततचा पाऊस आणि रोगाच्या प्रकोपामुळे यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळात होरपळ होत असतानाही प्रशासनाच्या लेखी सुकाळ असल्याचे चित्र सुधारित आणेवारीवरुन अधोरेखित करण्यात आले आहे. आठही तालुक्यातील केवळ ४६३ गावांची सुधारित आणेवारी ५० पैशांच्या आत तर ८७५ गावातील आणेवारी ५० च्यावर असल्याचे दर्शविल्याने या आणेवारीवर राजकीय पक्षांनी आक्षेप नोंदविला आहे.
जिल्ह्यात यावर्षी कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरिपाचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशीची तर १ लाख ३७ हजार २६६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. निसर्गकोप आणि रोगांचा प्रादुर्भात यामुळे सोयाबीनच्या पिकांचा जबर फटका बसला. तसेच कपाशीचे पीकही हातचे जाण्याच्या स्थितीत असून शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिंधींकडून पंचनामे करण्याची मागणी होत असतानाही कृषी विभाग निद्रावस्थेत आहे. कृषी विभागाच्या या कुंभकर्णी झोपेमुळेच बोगस बियाण्यांच्या सुळसुळाट झाला. शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीचे संकट पेलावे लागले.
जिल्ह्यात सर्वत्रच दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना शासनाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ३० सप्टेंबरपर्यंत नजरअंदाज तर ३१ ऑक्टोबरपर्यंत सुधािरत आणेवारी काढली असता प्रशासनाच्या लेखी १ हजार ३३८ गावांपैकी ८७५ गावांत ५० पैशावर तर ४६३ गावांतील आणेवारी ५० पैशांच्या आत नमूद करण्यात करण्यात आली. त्यामुळे ही आणेवारी फसवी असल्याचा आरोप राजकीय नेत्यांकडून होत असून ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम आणेवारीत ही आकडेवारी वाढणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
मी हिंगणघाट, समुद्रपूर, देवळी व वर्धा तालुक्यात फिरलो. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला असता कुठेही समाधानकारक परिस्थिती नाही. सर्व पीक उद्ध्वस्त झाले असून उत्पादनाची काहीच शास्वती नाही. अशाही स्थितीत प्रशासनाची आणेवारी ५० पैश्याच्या वर निघेतच कशी, हा प्रश्न आहे. यावरुन प्रशासनाने टेबलावर बसूनच अहवाल तयार केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला याबाबत जाब विचारला जाईल.
- अभिजित फाळके, संस्थापक अध्यक्ष, भूमिपुत्र संघर्ष वाहिनी
हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची पीक पाहणी केली. सोयाबीनही गेले आता कपाशीवरही बोंडअळींने आक्रमण केल्याने कपाशीही उद्ध्वस्त झाली आहे. पण, अद्यापही पंचनामे झाले नाही, ही शोकांतिका आहे. त्यातच प्रशासनाची आणेवारी चक्रावून टाकणारी असल्याने हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे बांधावर जाऊन पंचनामे करुन शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी.
- समीर कुणावार, आमदार