जिल्ह्यात खाकीचे भय हरले, अवैध धंदेवाईकांचे उंचावले मनोबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 09:38 PM2019-08-10T21:38:18+5:302019-08-10T21:39:05+5:30
जिल्ह्यात जोमात सुरू असलेली दारूबंदी, नाममात्र कारवाईमुळे दारूविक्रेत्यांचे उंचावलेले मनोबल, यातून दारूबंदी कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले यामुळे खाकीचे भय हरल्याचा प्रत्यय येत असून कायदा, सुव्यवस्था धोक्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात जोमात सुरू असलेली दारूबंदी, नाममात्र कारवाईमुळे दारूविक्रेत्यांचे उंचावलेले मनोबल, यातून दारूबंदी कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले यामुळे खाकीचे भय हरल्याचा प्रत्यय येत असून कायदा, सुव्यवस्था धोक्यात आली आहे.
जिल्ह्यात दारूबंदी आहे; मात्र सर्वत्र दारूचे पाट वाहतात. शहरात विदेशीचा बोलबाला, तर गावखेड्यात गावठी दारूभट्टीचा धूर निघतो. मात्र, दारू कायमस्वरूपी हद्दपार करण्याकरिता पोलिस विभागाचे प्रयत्न थिटे पडत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यभार हाती घेताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी गावागावांत ग्रामरक्षक दलाची स्थापना करून पोलिस विभागालाही दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. यानंतर पोलिसांनीही नव्याची नवलाई म्हणून शहरातील पोद्दार बगिचा परिसरातील एका बड्या दारूविक्रेत्यावर छापा घालून कारवाई केली. इतर दारूविक्रेत्यांवर कारवाईचे काय? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. पोलिस विभागाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने सद्यस्थितीत शहरातील विविध भागांत दारूचे गुत्थे राजरोसपणे सुरू आहेत. पोलिसांनी कारवाई केलेला बंद खोलीतील ‘तो’ बार परत सुरू झाल्याची माहिती आहे. शहरात अनेकांनी अशाच प्रकारे बंद खोलीत बार थाटले आहेत. असे असताना केवळ एका-दोघांवर कारवाई करून पोलिस विभाग नामानिराळा झाला. हिंगणघाट येथे तिघा दारूविक्रेत्यांनी दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षावर जीवघेणा हल्ला केला.
यापूर्वीही पोलिस कर्मचारी आणि सर्वसामान्यांवर दारूविक्रेत्यांकडून हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. पालकमंत्र्यांनी दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असताना पोलिस विभाग सुस्त आहे. कठोर कारवाईअभावी दारूविक्रेत्यांचे मनोबल उंचावले असून नागरिकांवर हल्ले केले जात आहेत. यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. पोलिस अधीक्षकांनी गांभीर्याने लक्ष देत दारूविक्रेत्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
डीबी पथके बनली वसुली पथके
शहरात शहर आणि रामनगर ठाण्याची डीबी पथके आहेत. या पथकांचा दारूविक्रेत्यांकडून वसुलीचा कार्यक्रम जोरात सुरू आहे. एका दारूविक्रेत्याकडून महिन्याकाठी २० ते २५ हजारांची रक्कम वसूल केली जात आहे. या पथकांनी पैसे द्या आणि व्यवसाय सुरू करा, अशी मुभाच विक्रेत्यांना दिली आहे.