जिल्हा सामान्य रुग्णालयात मायेची शिदोरी, रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मिळणार आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 03:13 PM2018-11-16T15:13:14+5:302018-11-16T15:13:58+5:30
वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या जिल्ह्याबाहेरील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सुविधा व्हावी या उद्देशाने येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मायेची शिदोरी उपक्रम राबविण्यात येत आहे.
वर्धा : वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या जिल्ह्याबाहेरील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सुविधा व्हावी या उद्देशाने येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मायेची शिदोरी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचा श्रीगणेशा शुक्रवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मायेची शिदोरी या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यातील विविध भागातून तसेच जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अत्यंत अल्प दरात निवाऱ्याची व्यवस्थेसह भोजन व अल्पोहाराची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर उपहारगृह व निवासीगृहाची संचालन जबाबदारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि. प. वर्धा यांना देण्यात आली आहे. सदरशी जुळून असलेल्या महिला बचतगटाच्या महिला रुग्णांना व रुग्णांच्या कुटुंबीयांना मायेची शिदोरी या उपक्रमाच्या माध्यमातून सुविधा देणार आहे. कार्यक्रमाला स्वाती वानखेडे, अमोल भागवत, रजनी शिरभैय्ये, विलास झोटिंग यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सुविधांचा लाभ घ्या - जिल्हाधिकारी
जिल्हा सामान्य रुग्णालयात मायेची शिदोरी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अतिशय अल्प दरात रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन, अल्पोहार व निवा-याची सुविधा करून देण्यात आली आहे. त्याचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.