जिल्हाभर कार्यक्रम : विविध भागातून निघालेल्या मिरवणुकीच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली
By admin | Published: April 15, 2017 12:29 AM2017-04-15T00:29:25+5:302017-04-15T00:29:25+5:30
क्रांतीसूर्य, महामानव, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष ....
वर्धा : क्रांतीसूर्य, महामानव, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करीत शुक्रवारी जिल्हाभर त्यांची १२६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्ह्यात विविध संघटनांच्यावतीने मिरवणूक काढून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. तर सर्वच शासकीय, निमशासकीय व शैक्षणिक संस्थांत महामानवाला अभिवादन करण्यात आले. वर्धेत सिव्हील लाईन परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ त्यांना अभिवादन करण्याकरिता वर्धेकरांची चांगलीच गर्दी बघायला मिळाली.
वर्धेत डॉ. बाबासाहेबांच्या जयंती उत्सवाला दोन दिवसांपासूनच प्रारंभ झाला. यात गुरुवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्यावतीने डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ केक कापून उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी युवकांचंी उपस्थिती होती. केक कापल्यानंतर पुतळ्यासमोर आतषबाजी करण्यात आली. जयंतीउत्सवानिमित्त पुतळा परिसरात रात्रभरच रेलचेल होती. तर शुक्रवारी पहाटेपासूनच महामानवाला अभिवादन करण्याकरिता नागरिकांची रिघ लावली होती. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. तसेच शहरातील गणमान्य मंडळींनीही अभिवादन केले. विहिंपच्यावतीनेही अभिवादन करण्यात आले.
सकाळच्या कोवळ्या उन्हात असलेली गर्दी ती वाढताना दिसून आली. सूर्य आग ओकत असतानाही महामानवाला अभिवादन करणाऱ्यांची संख्या मात्र कायमच होती. पुतळा परिसरात येणाऱ्या अनुयायांकरिता काही समाजसेवी संस्थांच्यावतीने थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तर बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार व्हावा, याकरिता असलेल्य काही पुस्तकांची दुकानेही येथे सजली होती. या दुकानात जात येथे येणारा नागरिक या पुस्तकावर नजर टाकूनच जात होता. तर काही सजावटीच्या साहित्याचीही दुकाने सजली होती. या दुकानातही नागरिकांची गर्दी होताना दिसून आले. पुस्तकांच्या दुकानातून बाबासाहेबांच्या जीवनीसह संविधान निर्मितीची माहिती देणाऱ्या पुस्तकांची मागणी अधिक असल्याची माहिती येथील एका पुस्तकविक्रेत्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
तत्पूर्वी शहरातील विविध भागातून युवकांच्या संघटनांकडून मिरवणूक काढण्यात आली. दिवसभर मिरवणुकांचे सत्र सुरूच होते. या मिरवणूकांतून बाबासाहेबांचा जयघोष सुरू होता. यानंतर विविध आंबेडकरी संघटनांच्यावतीने सायंकाळी ढोल ताशांच्या निनादात मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकांत महिला व पुरूष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निघालेल्या मिरवणुकांत बाबासाहेबांनी साकारलेल्या इतिहासाची झलक देणारे विविध देखावेही तयार करण्यात आले होते. चवदार तळ्याचा सत्याग्रह, संविधान यात्रा यासह अनेक सामाजिक समस्यांवर आघात घालणारे देखावे तयार करण्यात आले होते. या मिरवणुकीत सहभागी नागरिकांकरिता विविध संघटनांच्यावतीने लंगरची व्यवस्था केली होती. बजाज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत ठिकठिकाणी लंगरचे आयोजन करण्यात आले होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी वाहिली आदरांजली
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी एन. के. लोणकर, तहसीलदार जोशी व जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
रात्री १२ वाजता केक कापून दिल्या जयंतीच्या शुभेच्छा
डॉ. बाबासाहे आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने वर्धा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर केक कापून उपस्थितांना बाबासाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरी जनता उपस्थित होते. अनेकांनी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यासा माल्यार्पण करुन अभिवादन केले. यानंतर डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
जिल्ह्यात २११ मिरवणुका
महामानवाच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी तब्बल २११ मिरवणुका निघणार असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे. दुपारपर्यंतच ५९ मिरवणूका निघाल्याची नोंद पोलीस विभागाकडे झाली होती.
आकर्षक रोषणाईने वातावरण भीममय
.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी सिव्हील लाईन परिसरातील पुतळ्याजवळ आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. ही रोषणाई येथे येणाऱ्यांकरिता आकर्षणाचे केंद्र ठरली होती. पुतळा परिसरात रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेल्या रोषणाईने वातावरण भीममय झाले होते.
१५०६ पोलिसांचा बंदोबस्त
महामानवाच्या जयंती उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांच्यावतीने चोख बंदोबस्त करण्यात ठेवण्यात आला होता. प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी वाहतूक वळविण्यात आली होती. मिरवणुकींमुळे कुठेही वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली होती. यात ११५६ पोलीस कर्मचारी, गृहरक्षक ३५० या व्यतिरिक्त एसआरपीच्या दोन प्लाटून तैनात करण्यात आले होते.