सुसुंदच्या ग्रामस्थांची जिल्हा कचेरीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 10:10 PM2018-05-22T22:10:15+5:302018-05-22T22:10:15+5:30
सुसुंद परिसरात वन्य प्राण्यांचा वावर असून वाघाच्या हल्ल्यात आमगाव (जं.) येथील एक युवक ठार झाल्याची घटना ताजी आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांसह हैदोसामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सुसुंद परिसरात वन्य प्राण्यांचा वावर असून वाघाच्या हल्ल्यात आमगाव (जं.) येथील एक युवक ठार झाल्याची घटना ताजी आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांसह हैदोसामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे सुसुंद या गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्वात पोस्ट आॅफिस चौक येथून जिल्हा कचेरीपर्यंत मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनादरम्यान सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
सुसुंद गावाला लागून बोर व्याघ्र प्रकल्प आहे. या प्रकल्पात वाघ, अस्वल, बिबट, रोही आदी वन्य प्राणी आहेत. यात वनविभागाकडून मिळणारी मदत तोकडीच आहे. दरम्यान, आमगाव (ज.) येथील घटनेनंतर पोलीस, वन विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी आणि संतप्त ग्रामस्थांमध्ये वाद झाला होता. यावेळी ग्रामस्थांची गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. सुसुंद या गावातील नागरिकांना सध्या दहशतीच्या वातावरणात जगावे लागत असल्याने या गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणीही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
स्थानिक पोस्ट आॅफिस चौक येथून काढण्यात आलेला मोर्चा सुरुवातीला पोलिसांनी न्यायालयाच्या मुख्य द्वारासमोर अडविला; परंतु, यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या काहींनी पोलिसांना एवढ्या उन्हात आम्ही येथे कसे थांबणार, असे म्हणत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जावू देण्याची विनंती केली. त्यावर बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी संमती दर्शविल्याने मोर्चा जिल्हाकचेरीपर्यंत पोहोचला. याप्रसंगी पुन्हा एकदा पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यद्वारावर अडविले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. आंदोलनाचे नेतृत्व युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, समीर गिरी यांनी केले. मोर्चात युवा परिवर्तनच्या सदस्यांसह गावकरी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापुढे ठिय्या
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन चर्चा करण्यासाठी पोलिसांनी मोजक्याच व्यक्तींना दालनात सोडले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन चर्चेदरम्यान इतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या दिला.
पोलीस आंदोलकात शाब्दीक चकमक
पुनर्वसनच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य द्वारासमोर अडविले. संपूर्ण आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी न जाता केवळ पाच जणांनीच जावे असे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. त्यावर निवेदन देण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळात कमीत कमी दहा व्यक्तींना जिल्हाधिकारी कार्यालयात जावू द्यावे, अशी विनंती याप्रसंगी प्रशांत पवार यांनी केली. या मुद्दावर आंदोलक आणि पोलिसांत चांगलीच शाब्दीक चकमक उडाली होती.