जिल्हा पुन्हा गारठला; पारा ९ अंशावर
By admin | Published: January 23, 2016 02:12 AM2016-01-23T02:12:47+5:302016-01-23T02:12:47+5:30
वातावरणात हवेचा दाब वाढताच थंडीचा कडाका जाणवायला लागला आहे. दोन दिवसांपासून किमान तापमान १२ ते १० अंशाच्या घरात आहे.
उत्तरेकडील लाटेचा प्रभाव : पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याचे संकेत
वर्धा : वातावरणात हवेचा दाब वाढताच थंडीचा कडाका जाणवायला लागला आहे. दोन दिवसांपासून किमान तापमान १२ ते १० अंशाच्या घरात आहे. यामुळे मध्यंतरी लोप पावलेल्या थंडीचा प्रभाव जाणवत आहे. एरव्ही रात्री उशीरापर्यंत शहरातील रस्त्यावर वर्दळ पाहायला मिळते; पण थंडीचा कडाका सुरू झाल्याने रात्री नऊ वाजेपर्यंत रस्ते ओस पडलेले असतात. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या लाटेमुळे पुढील दोन दिवस थंडीचा कडाका जाणवेल, असा अंजाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाले आहे. हवेचा दाब वाढल्याने वातावरणात थंडीचे प्रमाण वाढत आहे. मध्यंतरी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने उत्तरेकडून वाहणारे थंड वारे अडत होते. परिणामी, थंडीचा प्रभाव ओसरला होता. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला. जिल्ह्यात काही भागात पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरणामुळे काही प्रमाणात उकाडा जाणवायला लागला होता. जानेवारी महिन्यात जाणवणारी थंडी ओसरल्याचा अनुभव येत होता. या काळात कमाल व किमान तापमानात वाढ झाली होती. कमाल तापमान ३०.९ अंशावर स्थिरावले होते तर किमान तापमान १८ अंशापर्यंत होते. किमान तापमानातही वाढ झाल्याने थंडीचा प्रभाव कमी झाला होता. लोप पावलेली थंडी जाणवायला लागल्याने शेकोटी पेटवून थंडीचा आनंद लुटताना दिसत आहे.
विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचारी उनी कपडे घालून कार्यावर जाताना दिसले. दिवसभर बाहेर पडताना नागरिकांनी उबदार कपडे घालूनच बाहेर पडणे पसंत केले. रात्रीच्या वेळी शहरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळत आहे. यंदा हिवाळ्यातही तापमानाचा पारा १५ अंशांच्या वर स्थिरावल्याने थंडीचा प्रभाव कमीच जाणवत आहे. यातही डिसेंबर अखेरीस थंडीची चाहुल लागल्यावर ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाल्याचा प्रत्यय येत होता. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ४५ पर्यंत असल्याने याचा परिणाम तापमान वाढीवर होऊन उकाडा जाणवायला लागल होता. यामुळे हिवाळ्यातच उनी कपड्यांचा व्यापारही थंडावला होता. थंडी पुन्हा स्थिरावत असल्याने जिल्हावासीय याचा आनंद घेताना दिसून येत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)