जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 12:14 AM2019-08-02T00:14:53+5:302019-08-02T00:15:30+5:30
येथील सिव्हील लाईन भागातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या छताला गळती लागल्याने तेथील कामकाज ठप्प झाले आहे. छतावर साठणारे पावसाचे पाणी पहिल्या माळ्यावर असलेल्या कार्यालयात ठिकठिकाणी गळत असल्याने आणि भिंतीही पूर्णपणे ओल्या झाल्याने भिंतीला स्पर्श केल्यानंतर विद्युत प्रवाहाचा झटकाच लागतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील सिव्हील लाईन भागातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या छताला गळती लागल्याने तेथील कामकाज ठप्प झाले आहे. छतावर साठणारे पावसाचे पाणी पहिल्या माळ्यावर असलेल्या कार्यालयात ठिकठिकाणी गळत असल्याने आणि भिंतीही पूर्णपणे ओल्या झाल्याने भिंतीला स्पर्श केल्यानंतर विद्युत प्रवाहाचा झटकाच लागतो. त्यामुळे गुरूवारी कार्यरत कर्मचाऱ्यांनी सदर कार्यालयात काम करण्यास नकार देत याच इमारतीच्या खालील खोलीत दिवसभऱ्याची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, छताच्या गळतीमुळे संपूर्ण कामकाजच ठप्प झाले होते.
शाळकरी मुला-मुलींसह तरुण-तरुणींमध्ये मैदानी खेळ आणि खेळाडूवृत्ती रुजावी यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने विशेष प्रयत्न केले जाते. येथील सिव्हील लाईन भागातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात एकूण ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. परंतु, सध्या येथे सातच अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातही कार्यारत असलेल्या सात कर्मचाºयांपैकी दोघांची बदली झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कार्यरत असलेल्या पाच कर्मचाऱ्यांच्या खांद्यावरच या कार्यालयाचा डोलारा असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये. येथे कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी मनमर्जीनेच काम करीत असल्याने त्याचा फटका अनेकांना सहन करावा लागत असल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे. सुसज्य आणि अवघ्या काही वर्षांपूर्वी तयार केलेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या इमारतीला गळती लागल्याने कुठल्या गुणवत्तेचे काम त्यावेळी करण्यात आले याचा दाखलाच सध्या या कार्यालयाचा फेरफटका मारल्यावर मिळतो. संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.
कागदपत्रांना ताडपत्रीचा आधार
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला चांगलीच गळती लागल्याने गुरूवारी या कार्यालयातील कामकाजावर याचा परिणाम झाला. इतकेच नव्हे तर सुसज्य इमारतीच्या छताला गळती लागल्याचे लक्षात येताच कर्तव्यावर असलेल्या कर्मचाºयांनी कार्यालयीन कागदपत्रे ओली होऊ नये म्हणून त्या एकाठिकाणी करून त्यावर ताडपत्री टाकल्याचे दिसून आले. असे असले तरी काही प्रमाणात कागदपत्रे ओली झाल्याचे सांगण्यात येते.
भिंतीत विद्युत प्रवाहित
छताला गळती लागल्याने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जलमयच झाले. इतकेच नव्हे तर या कार्यालयातील प्रत्येक भिंत ओली झाली असून त्याला स्पर्श केल्यावर विद्युत प्रवाहाचा सौम्य झटका बसत असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन गुरूवारी या कार्यालयातील कर्मचाºयांनी कार्यालयात न थांबता तळ मजल्यावरील एका खोलीत आपले कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न केला.
छताला गळती लागल्याने आणि भिंतीही ओल्या झाल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन कर्मचाºयांना योग्य दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. छताला गळती लागल्याने कार्यालयातील कामकाम प्रभावीत झाले आहे. दोन दिवसांपासून ही गळती सुरू आहे.
- लतीका माने, जिल्हा क्रीडा अधिकारी, वर्धा.