परिवहन मंडळाचे ऑटोमोबाईल अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार, दिवाकर रावते यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 04:28 PM2017-11-11T16:28:58+5:302017-11-11T16:29:16+5:30
परिवहन महामंडळाचे ऑटोमोबाईल अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार असून त्यामध्ये 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना प्रवेश देण्यात येईल.
वर्धा: परिवहन महामंडळाचे ऑटोमोबाईल अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार असून त्यामध्ये 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना प्रवेश देण्यात येईल. तसेच मुंबईत बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये सुद्धा 25 टक्के जागा ठेवणार आहे. कर्मचा-यांचा आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कुटुंब सुरक्षा योजना सुरू केली आहे. मुंबईतील कर्मचा-यांसाठी 1 हजार घरे बांधून देण्याचे काम सुरू असल्याचे परिवहन मंञी दिवाकर रावते यांनी वर्धा येथे सांगितले. आज वर्धा बसस्थानकाचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
परिवहन महामंडळामध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करतात. त्यामुळे महिलांना त्यांच्या गावातच नियुक्ती देण्याची गरज आहे. जेणेकरून त्यांची ओढाताण कमी होऊन कुटुंबाला वेळ देण्याबतच त्या चांगल्या प्रकारे काम करू शकतील, असं रावते यांनी यावेळी म्हंटलं. पालकत्वाच्या भूमिकेतून काम करतो असे सांगताना ते म्हणाले महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचाही विचार केला आहे. त्यामुळे महिलांनी निर्भयपणे काम करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. .
राज्यातील बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या पद्धतीने होणारे बस्थानकाचे बांधकाम आता बंद केले आहे. राज्य परिवहन महामंडळच यापुढे सर्व बस स्थानक बांधणार आहेत हे सांगताना ते म्हणाले 85 कोटीचे बस स्थानक राज्यात बांधणार असून त्यामध्ये 48 कोटींची बसस्थानके केवळ विदर्भात निर्माण होत आहेत. हा सर्व खर्च भांडवली खर्चातुन करण्यात येणार आहे. याशिवाय विदर्भातील सर्व जुने बसस्थानक रंगरंगोटी करून प्रवाशाना सुखद वाटतील, असे करण्यात येणार असून यासाठी 3 कोटी 15 लक्ष 60 हजार रुपये निधीचे नियोजन केले आहे. याशिवाय 3 हजार प्रवाशी निवारे बांधण्यात येणार आहेत.तसेच सर्व बसस्थानके स्वछ ठेवण्यासाठी खाजगी संस्थांची नेमणूक केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.