महामार्गावरील डायव्हर्शन पूल गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 11:24 PM2019-07-31T23:24:24+5:302019-07-31T23:24:45+5:30
आष्टी, साहूर, द्रुगवाडा या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रुंदीकरण व नूतनीकरणाच्या कामातील निर्माणाधीन पुलाच्या शेजारी तयार केलेले डायव्हर्शन जाम नदीला पूर आल्याने वाहून गेले. त्यामुळे रात्री २ वाजतापासून दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : आष्टी, साहूर, द्रुगवाडा या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रुंदीकरण व नूतनीकरणाच्या कामातील निर्माणाधीन पुलाच्या शेजारी तयार केलेले डायव्हर्शन जाम नदीला पूर आल्याने वाहून गेले. त्यामुळे रात्री २ वाजतापासून दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. शेकडो वाहनांचा मुक्काम जागीच झाला. बुधवारी सकाळी ६ वाजता पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली. पाण्याचा वेग जास्त असल्याने काळजाचा ठोका वाढविणारे चित्र पाहायला मिळाले.
निर्माणाधीन पुलाचे बांधकाम उन्हाळ्यात संथगतीने करण्यात आले. वेळेवर पूल झाला नाही. त्यामुळे बाजूला केलेल्या डायव्हर्शनवरून हजारो वाहने धावत होती. हा पूल जाम नदीवर असल्याने याठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने त्याचा प्रवाह डायव्हर्शनमुळे खुंटला होता. मात्र, पुराने रौद्र रूप धारण केल्याने टाकलेल्या १२ पायल्यांसह पूल वाहून गेला. पाण्याचा वेग जास्त होता. शिवाय, खळखळ आवाज आल्याने बाजूला झोपड्यांमध्ये राहणारे कंपनीचे कर्मचारी आले. लागलीच वाहन चालकांना थांबविण्यात आले. या मार्गाने जाणारे ४ ट्रक एकामागे एक जात होते. येथे कुणी सूचना करायला आले नसते तर अनर्थ झाला असता. याची कल्पनाच न केलेली बरी, अशा प्रतिक्रिया ट्रकचालकांनी लोकमतशी बोलताना दिली.
बुधवारी सकाळी पावसाची दमदार हजेरी सुरूच होती. पाण्याच्या प्रवाहामुळे सर्व वाहतूक आष्टी, पोरगव्हाण, पंचाळा, झाडगाव, बोरगाव (टुमणी), साहूर, वरूड तर काही वाहतुक साहूर, माणिकवाडा, नारा, काकडा, सुसुंद्रामार्गे कारंजा वळविण्यात आली. सकाळी महामार्गावर पोलिसांनी पाहणी करून वाहतुक सुरळीत केली.
निर्माणाधीन पुलाकडे दुर्लक्ष
या रस्त्याचे काम आंध्रप्रदेश मधील आर.आर. कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतले होते. पुलाचे काम सुरू केल्यावर अनेक दिवस स्लॅब टाकला नाही. त्यामुळे पावसाळ्यात पुलावरून वाहतूक सुरू होण्यात बराच अडथळा निर्माण झाला होता. कंपनीचे अधिकारी या पुलाकडे फिरकत नव्हते. त्यामुळे आजचा भीषण प्रसंगाला पाहण्याची ग्रामस्थांवर वेळ आली.
परिसरातील शेतात पाणीच पाणी
जाम नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील शेती जलमय झाल्या आहेत. अनेक शेतातील भागात भगदाड पडले आहे. पीकही खराब झाले आहे. धाडी येथील विजय मानकर, अशोक तनाटे, सुयोग चोरे यांनी वळणमार्गे वाहतुकीची माहिती वाहनचालक आणि प्रवाशांना दिली. शेतकऱ्यांनी शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याचे सांगितले.