दुभाजकाची माती रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:34 AM2018-04-16T00:34:15+5:302018-04-16T00:34:15+5:30
वर्धा शहरातील बॅचलर रस्त्याचे नुकतेच रूंदीकरण व सिमेंटीकरण करण्यात आले. यात रस्ता निर्मिती करताना दुभाजक सोडण्यात आले. रस्ता सुरू झाल्यानंतर बांधकाम विभागाकडून आता दुभाजकाचे काम सुरू करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा शहरातील बॅचलर रस्त्याचे नुकतेच रूंदीकरण व सिमेंटीकरण करण्यात आले. यात रस्ता निर्मिती करताना दुभाजक सोडण्यात आले. रस्ता सुरू झाल्यानंतर बांधकाम विभागाकडून आता दुभाजकाचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम करताना रस्ता दुभाजकाकरिता तयार करण्यात आलेल्या खड्ड्यातील माती रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. या मातीमुळे वाहने घसरल्याने येथे किरकोळ अपघात झाले आहे. यामुळे बांधकाम विभागाकडून ही माती त्वरीत उचलण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
खड्ड्यातील माती रस्त्याच्या मधोमध आल्याने रस्त्याची रूंदी कमी झाली आहे. यामुळे येथून वाहने चालवितानाही मोठी अडचण निर्माण होत आहे. येथून वाहने नेताना पुरेशी जागा मिळत नसल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. या रस्त्याने मोठे महविद्यालय, दवाखाना, मंगलकार्यालय आहे. शिवाय शहरातील सर्वाधिक शिकवणी वर्ग याच मार्गावर असल्याने येथे वाहनांची गर्दी होते. यामुळे अपघाताची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यावर असलेली माती बांधकाम विभागाने उचलाची किंवा दुभाजकात भरावी अशी मागणी होत आहे.
रस्त्याच्या मधोमध असलेल्या या मातीच्या ढिगाऱ्यामुळे रात्रीच्यावेळी येथून चारचाकी वाहने चालविणे कठीण झाले आहे. रस्त्याच्या मधोमध माती आणि रस्त्याच्या कडेला खचका तयार झाल्याने वाहन रस्त्याच्या खाली जाण्याची शक्यता आहे. या मातीच्या ढिगावरून वाहन नेल्यास ते दुभाजकाला लावण्याकरिता तयार केलेल्या सिमेंटच्या प्लेटांवर जाण्याची शक्यता आहे. तसे प्रकार येथे घडलेही आहेत. नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्याच घरासमोर एक कार रस्त्याच्या कडेला घसरल्याचे दिसून आले. तर लोक महाविद्यालयाजवळ रस्ता दुभाजकाच्या खड्ड्यांत वाहन उतरल्याचा प्रकारही येथे घडला आहे. यात मोठा अपघात झाला नसला तरी यातून मोठी घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याकडे बांधकाम विभागाच्यावतीने लक्ष देत कार्यवाही करून ही माती उचलण्याची गरज आहे. अन्यथा येथे मोठी घटना घडण्याची शक्यता आहे.
मातीमुळे उडत असलेल्या धुळीमुळे आसपासच्या नागरिकांसह व्यावसायिक त्रस्त
रस्त्यावर असलेल्या माहितीमुळे येथून वाहन जाताच धूळ मोठ्या प्रमाणात उघते. ही धूळ येथे आसपासच्या दुकानात उघडत असल्याने येथील व्यावसायिक यामुळे त्रस्त झाले आहे. केवळ व्यावसायिकच नाही तर या भागातील नागरिकही त्रस्त झाले आहे. दारे खिडक्या बंद असल्या तरी नकळत मोठ्या प्रमाणात धूळ घरात येते. घरातील महागड्या वस्तुंवरही धुळाचा थर साचत असल्याचे दिसून आले आहे. या धुळामुळे घरातील वस्तू खराब होत असून नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. नागरिकांची ही समस्या टाळण्याकरिता माती उचलण्याची मागणी आहे.