जागतिक अपंगदिनी मोबदल्यासाठी दिव्यांगांची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 11:36 PM2017-12-03T23:36:42+5:302017-12-03T23:39:29+5:30
जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून रविवारी स्थानिक बजाज चौक येथून सकाळी १२ वाजताच्या सुमारास प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या नेतृत्त्वात मोर्चा काढण्यात आला. दिव्यांग बांधवांचा हा मोर्चा दुपारी १.३० वाजताच्या सुमारास शांतीनगर भागातील मिनल इथापे यांच्या निवासस्थानी पोहोचला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून रविवारी स्थानिक बजाज चौक येथून सकाळी १२ वाजताच्या सुमारास प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या नेतृत्त्वात मोर्चा काढण्यात आला. दिव्यांग बांधवांचा हा मोर्चा दुपारी १.३० वाजताच्या सुमारास शांतीनगर भागातील मिनल इथापे यांच्या निवासस्थानी पोहोचला. या वेळी आंदोलनकर्त्यांनी त्यांना केलेल्या कामाचा मोबदला देण्याची मागणी रेटत ठिय्या दिला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
कौशल्य विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना प्रशिक्षण दिले. त्यानंतर सहा महिन्यांपर्यंत प्रती महिना तीन हजार रुपये प्रमाणे काम दिले. मिनल इथापे या कर्मचारी असलेल्या संस्थेच्यावतीने देण्यात आलेले काम दिव्यांग बांधवांनी पूर्णही केले. मात्र, या कामाचा एकाही महिन्याचा मोबदला देण्यात आला नाही. परिणामी, दिव्यांग बांधवांनी काम बंद केले. मोबदल्याबाबत वारंवार विचारणा केली असता उडवा-उडवीचे उत्तरे दिल्या जात असल्याचा आरोप करीत कामाचा तात्काळ मोबदला देण्यात यावा, अशी मागणी लावून धरली.
स्थानिक बजाज चौक येथून काढण्यात आलेल्या मोर्चाने सोशालिस्ट चौक, शिवाजी चौक, धंतोली चौक, वंजारी चौक, सिंदी (मेघे) नाका चौक होत मिनल इथापे यांचे निवासस्थान गाठले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी इथापे यांच्या घरासमोर सुमारे तासभर ठिय्या देत संबंधितांशी चर्चा केली. मात्र, चर्चेअंती कामाचा मोबदला देण्याबाबत समाधानकारक तोडगा न निघाल्याने आंदोलनकर्त्यांनी आपला मोर्चा फसवणुकीची तक्रार करण्याकरिता रामनगर पोलीस कचेरीकडे वळविला. आंदोलनाचे नेतृत्त्व हनुमंत झोटींग, राजेश सावरकर, विकास दांडगे यांनी केले. आंदोलनात सिद्धार्थ उरकुडे, प्रमोद कुरटकर, शैलेश सहारे, धनराज घुमे, सुनील मिश्रा, राजेश पंपनवार, चंद्रशेखर देशपांडे, अजय भोयर यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.
काम करून घेतलेल्यांना मोबदला मिळणे क्रमप्राप्त आहे. आपण जिल्ह्यात उपक्रम राबविणाºया हर्षल ग्रामीण बहूउद्देशीय संस्था चंद्रपूरचे केवळ एक कर्मचारी म्हणून काम पाहिले. सदर संस्थेनेही दिव्यांग बांधवांना त्यांच्या कामाचा मोबदला तात्काळ दिला पाहिजे.
- मिनल इथापे, कर्मचारी, हर्षल ग्रामीण बहूउद्देशीय संस्था केंद्र, वर्धा.
२४० दिव्यांगांना प्रशिक्षण
कौशल्य विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील २४० दिव्यांग बांधवांना प्रशिक्षण देत त्यांच्याकडून काम करून घेतले;पण त्यांना एकाही महिन्याचा कामाचा मोबदला देण्यात आला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
बंदोबस्तामुळे पोलीस छावणीचे स्वरूप
आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडून नये म्हणून आंदोलनस्थळी रामनगर पोलिसांसह दंगल नियंत्रण पथकाचे जवान तैनात होते. पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तामुळे काही काळाकरिता वायफड मार्गाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.