दिव्यांगांचा वर्धा जि.प. सीईओंना तासभर घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 03:15 PM2018-06-07T15:15:42+5:302018-06-07T15:15:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला; पण संबंधितांकडून मागण्यांच्या निवेदनांना केराची टोपलीच दाखविली जात असल्याचा आरोप करीत गुरूवारी प्रहारच्या नेतृत्त्वात संतप्त दिव्यांग बांधवांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांना त्यांच्याच दालनात चक्क तासभर घेराव घातला. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती आंदोलनकर्त्या दिव्यांग बांधवांनी घेराव आंदोलन मागे घेत जि.प. कार्यालयासमोर धरणे दिले.
बिज भांडवल योजनेतून कर्जपुरवठा दिव्यांगांना होत नसून तो तात्काळ करण्यात यावा. दिव्यांगांना घरकुल योजनेत प्राधान्याने सामावून घेत त्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात यावा. स्वयंरोजगारासाठी २०० चौ.फु. जागा दिव्यांग बांधवांना देण्यात यावी. शिवाय तसा ठराव जि.प. व इतर कार्यालयात घेण्याच्या सूचना करण्यात याव्या. ग्रा.पं., पं.स., जि.प. स्थरावर दिव्यांग बांधवांच्या वाट्याचा असलेला ३ टक्के निधी खर्च करण्यासंदर्भात जिल्ह्यात कुठेही समिती स्थापन करण्यात आली नाही. ती तात्काळ करण्यात यावी आदी मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी रेटून धरल्या होत्या. मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघेपर्यंत आम्ही दालनातून बाहेर जाणार नाही अशी ठाम भूमिका यावेळी आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. सदर आंदोलनामुळे जि.प. प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच तारांबळ उडाली होती. आंदोलनादरम्यान दिव्यांग बांधवांनी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांना त्यांच्याच दालनात घेराव घातला. यावेळी आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्यांनी जि.प. समाज कल्याण अधिकारी ए. आर. रामटेके यांंच्यासह जि. प. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. सुमारे तासभर झालेल्या सकारात्मक चचेर्अंती आंदोलनकर्त्यांनी घेराव मागे घेत जि.प. कार्यालयासमोर धरणे दिले.