कार्यालयात ‘दिवाळी फिव्हर’; कर्मचारी ‘नॉट हिअर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2022 09:12 PM2022-10-28T21:12:20+5:302022-10-28T21:13:25+5:30

दिवाळीला शनिवारपासून सुरुवात झाली. सोमवारी लक्ष्मीपूजन, मंगळवारी गायगोधन आणि बुधवारी भाऊबीज होती. त्यामुळे बुधवारपर्यंत सुट्या झाल्यानंतर गुरुवारपासून नियमित कार्यालये सुरू झाली. गुरुवार आणि शुक्रवारी या कार्यालयीन दिवसानंतर पुन्हा शनिवार आणि रविवारी सुट्या आल्याने बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेल्या शनिवारपासून आठवड्याभराचा बेत आखला.

'Diwali fever' in the office; Employees 'Not Here' | कार्यालयात ‘दिवाळी फिव्हर’; कर्मचारी ‘नॉट हिअर’

कार्यालयात ‘दिवाळी फिव्हर’; कर्मचारी ‘नॉट हिअर’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दिवाळी हा महत्त्वाचा सण असल्याने शासकीय अधिकारी व कर्मचारीही दिवाळी साजरी करण्याकरिता आपापल्या गावी निघून गेले. दिवाळीचा सण आटोपल्यानंतर गुरुवारपासून नियमित कामकाजाला सुरुवात होईल, अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती; पण, गुरुवार तर सोडा; शुक्रवारीही कार्यालयातील खुर्च्या रित्याच दिसून आल्याने शासकीय कार्यालयांतील ‘दिवाळी फिव्हर’ अजूनही कायम आहे.
दिवाळीला शनिवारपासून सुरुवात झाली. सोमवारी लक्ष्मीपूजन, मंगळवारी गायगोधन आणि बुधवारी भाऊबीज होती. त्यामुळे बुधवारपर्यंत सुट्या झाल्यानंतर गुरुवारपासून नियमित कार्यालये सुरू झाली. गुरुवार आणि शुक्रवारी या कार्यालयीन दिवसानंतर पुन्हा शनिवार आणि रविवारी सुट्या आल्याने बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेल्या शनिवारपासून आठवड्याभराचा बेत आखला. ते शनिवारपासूनच रजेवर गेले असून, अद्यापही कार्यालयात रुजू झाले नसल्याने गुरुवार आणि शुक्रवारी शासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट दिसून आला. आता सोमवारपासूनच कार्यालयातील कामकाजाला गती येण्याची शक्यता आहे.

फक्त कार्यालय बंद राहता कामा नये ! 
- जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन, वित्त व लेखा विभाग, कृषी विभाग, शिक्षण विभाग माध्यमिक यांसह इतरही विभागांमध्ये बोटांवर मोजण्याइतकेच कर्मचारी उपस्थित होते. अशीच परिस्थिती जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि पंचायत समितीच्या कार्यालयातही दिसून आली. 
- बहुतांश अधिकारी  व कर्मचारी जिल्ह्याबाहेरील असल्याने ते दिवाळीनिमित्ताने आपापल्या गावाकडे निघून गेले. आता दोन दिवस शनिवार व रविवारची सुटी अनेकांनी मुक्काम वाढविला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत काम थांबले तरी चालेल; पण कार्यालय बंद राहता कामा नये, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. म्हणूनच कार्यालय उघडे करून काही कर्मचारीच कार्यालयात उपस्थित असल्याचे दिसून आले. या सर्वामध्ये कामानिमित्त आलेल्यांचा हिरमोड झाला.

कामकाज नाहीच, केवळ गप्पाच
- दिवाळीकरिता गेलेले अधिकारी व कर्मचारी सुट्या संपूनही परतले नसल्याने सर्वसामान्यांच्या कामकाजाचे दिवाळे निघत आहे. जे कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते, त्यांतील मोजक्याच कर्मचाऱ्यांनी नियमित कामकाजाला सुरुवात केली. बहुतांश कर्मचारी आज गप्पागोष्टींमध्ये गुंग होते. काही मोबाईलमध्ये व्यस्त होते, तर काही कार्यालय परिसरातील किंवा बाहेरील कॅन्टीनमध्ये वेळ घालवीत असल्याचे पाहावयास मिळाले.

रिकाम्या खुर्च्या पहा, गावाकडे परत जा ! 
- सोमवारी लक्ष्मीपूजन असल्याने काही अधिकारी व कर्मचारी गेल्या शनिवारपासूनच सुटीवर गेले. त्यामुळे   गुरुवारपासून तरी कामकाज सुरळीत सुरू होईल, अशी नागरिकांना अपेक्षा होती. त्यामुळे विविध कामांनिमित्त शेतकऱ्यांसह इतरही व्यक्ती गुरुवार आणि शुक्रवारी शासकीय कार्यालयामध्ये उपस्थित झाले; परंतु पुन्हा शनिवार आणि रविवारची सुटी असल्याने शुक्रवारीही कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. आजही अधिकारी व कर्मचारी नसल्याने नागरिकांना परत जावे लागले.
 

दालनात टेबलावरील फाईललाही पंख्याची हवा!
- जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये फेरफटका मारला असता बहुतांश विभागात विभागप्रमुखांसह निम्म्यापेक्षा अधिक कर्मचारी रजेवर होते. त्यामुळे कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांकरिता कार्यालयातील लाईट आणि पंखे सुरू करणे अपेक्षित होते; पण दोन ते तीन कर्मचाऱ्यांकरिता कार्यालयातील सर्वच पंखे व लाईट सुरू करून विजेची उधळपट्टी चालविल्याचे निदर्शनास आले. वित्त विभागात विभागप्रमुख दालनात उपस्थित नसतानाही त्यांच्या टेबलावरील फाईलला दालनातील पंखा हवा घालत होता आणि सर्व लाईट प्रकाश देत असल्याचे चित्र दिसून आले.
 

 

Web Title: 'Diwali fever' in the office; Employees 'Not Here'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.