खासदार रामदास तडस यांच्या गावात साजरी झाली दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 11:48 PM2019-05-23T23:48:28+5:302019-05-23T23:50:14+5:30
वर्धा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार रामदास तडस यांच्या मूळ गावी नागरिकांनी भव्य मिरवणूक काढून विजयोत्सव साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करीत आकाशही प्रकाशमय केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : वर्धा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार रामदास तडस यांच्या मूळ गावी नागरिकांनी भव्य मिरवणूक काढून विजयोत्सव साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करीत आकाशही प्रकाशमय केले.
रामदास तडस यांनी यापूर्वी २०१४ ला लोकसभा निवडणुकीत २ लाख २५ हजार मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला होता. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा विजय संपादित केल्याने देवळीकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांचा हा आनंद शहरातील चौकाचौकांत दिसून आला. कुस्तीच्या लाल मातीत विरोधकाला लोळवत देवळीचा नावलौकिक करणारे रामदास तडस आता पुन्हा एकदा भारताच्या सर्वोच्च सभागृहात जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी ढोल-ताशाच्या निनादात मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला.
रामदास तडस यांच्या व्यक्तिमत्त्वाची सुरूवात कुस्ती खेळातून झाली. कुस्ती स्पर्धेत त्यांनी सलग चारवेळा विदर्भ केसरीचा बहुमान पटकाविला. यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला दिवसेंदिवस बहर येत गेला. देवळीचे ज्येष्ठ नेते व स्वातंत्र्य सेनानी मोतीलालजी कपूर यांची नगरपालिकेमध्ये असलेली ३५ वर्षांची एकहाती राजवट उलथवून देवळीचे नगराध्यक्षपद भूषविले. राजकीय महत्त्वाकांक्षा व प्रबळ इच्छाशक्ती असल्याने त्यांना वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विधान परिषदेची उमेदवारी मिळाली. यातही सलग दोनदा ते विजयश्री झाले. महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे संचालक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी २०१४ मध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविली. यातही त्यांना भरघोस मताने मतदारांनी निवडून दिले. आता पुन्हा दुसऱ्यांदा तेवढ्याच मताधिक्क्याने निवडून देत सभागृहात पाठविले. आजच्या या विजयानिमित्त नगरपालिकेचे शिक्षण सभापती नंदू वैद्य यांच्या घरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. खासदार तडस यांच्या पत्नी शोभा तडस, नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर, नगरसेविका कल्पना ढोक, सारिका लाकडे, सुनीता ताडाम, सुनीता बकाणे, संध्या कारोटकर, पं. स. उपसभापती मारोती लोहवे यांच्यासह शहरातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.