ज्ञानेश्वर गादेकर ठरला विदर्भ केसरी; महिलांमधून साक्षी माळी यांना मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2022 10:38 AM2022-04-04T10:38:17+5:302022-04-04T10:40:53+5:30
देवळीत पुरुषांसह महिलांच्याही कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते.
हरिदास ढोक
देवळी (वर्धा) :विदर्भ केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या अतिशय चुरशीच्या लढतील वाशिम जिल्ह्यातील एकाच आखाड्याच्या दोन मल्लांच्या डावपेचांची उधळण मनाचा वेध घेणारी ठरली. या प्रेक्षणीय सामन्यात ज्ञानेश्वर गादेकर याने प्रतिस्पर्धी पहिलवान सुदर्शन हराळ यांच्यावर तीन गुणांनी मात करून, विदर्भ केसरीचा बहुमान पटकाविला.
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार, तसेच स्पर्धेचे आयोजक खा. रामदास तडस यांच्या हस्ते विदर्भ केसरी ज्ञानेश्वर गादेकर याला चांदीची गदा, शिल्ड, तसेच ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘मातीतील हा खेळ आता गादीवर आला असून, यासाठी संधी व सोयी उपलब्ध करून देण्याची, तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंचा यात समावेश करण्याची गरज आहे. ऑलिम्पिक व हिंद केसरीपर्यंत भरारी घेण्यासाठी खासदार क्रीडा महोत्सवाचे महत्त्व असल्याचे सांगितले.
महिलांच्या कुस्तीतही रंगत
देवळीत पुरुषांसह महिलांच्याही कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांमधून अकोल्याची साक्षी माळी विदर्भ केसरी ठरली असून, तेथीलच कल्याणी माहुरे ही उपविजेती ठरली, तर यवतमाळच्या जेमिनी बागवान हिने तृतीय क्रमांक पटकाविला. पुरुषांमधून विदर्भ केसरीचा बहुमान वाशिमच्या ज्ञानेश्वर गादेकर, उप-विदर्भ केसरी म्हणून सुदर्शन हराळ तर तिसरा पुरस्कार यवतमाळच्या उमेश महापुरे यांनी पटकाविला.
वाशिमच्या कुस्तीगीर संघाला चॅम्पियनशिप
पुरुष गटातून वाशिम कुस्तीगीर संघाने चांगले प्रदर्शन केल्याने चॅम्पियनशिप देण्यात आली, तर द्वितीय चॅम्पियनशिप चंद्रपूर जिल्हा कुस्तीगीर संघाला दिली. महिलांची चॅम्पियनशिप नागपूर जिल्हा कुस्तीगीर संघाने मिळविली असून,तसेच द्वितीय चॅम्पियनशिप भंडारा जिल्हा कुस्तीगीर संघाला देण्यात आली.