‘त्या’ गैरहजर डॉक्टरांवर कारवाईस दिरंगाई
By admin | Published: June 29, 2016 02:06 AM2016-06-29T02:06:35+5:302016-06-29T02:06:35+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.एस. रंगारी, डॉ. अरविंद भंडारी या दोन्ही डॉक्टरांनी गैरहजर राहून...
नागरिक संतप्त : आरोग्य अधिकाऱ्यांना विसर
आष्टी (शहीद) : प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.एस. रंगारी, डॉ. अरविंद भंडारी या दोन्ही डॉक्टरांनी गैरहजर राहून वैद्यकीय सेवा व कर्तव्यात कुचराई केल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला होता. याला पाच दिवसांचा कालावधी झाला तरी त्यांच्याकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता अद्यापर्यंत मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे कुठलाही अहवाल पाठविण्यात आला नाही. त्यामुळे आरोग्य विभाग या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात कुठलीही सुविधा नाही. औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णाला बाहेरून औषध विकत घ्यावे लागते. शासनाच्या योजना असताना रुग्णांना याचाही भुर्दंड सहन करावा लागत आहे. येथे नियमित वैद्यकीय अधिकारी सेवेच्या नावाखाली सतत गैरहजर राहतात. त्यामुळे विविध प्रकरणातील जखमी तथा अपघातग्रस्तांवर उपचार करण्यास अडथळा निर्माण होतो. अशा कठीण प्रसंगी वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहून साहूर प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून जा, असा सल्ला देवून मोकळे होतात.
या सर्व प्रकरणाच्या तक्रारी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांच्याकडे गेल्यावर त्यांनी डॉ. रंगारी व डॉ. भंडारी या दोघांच्याही निलंबनाचा प्रस्ताव सीईओंकडे पाठविणार असल्याचे गावकऱ्यांना सांगितले होते; मात्र पाच दिवसांचा कालावधी लोटला तरी काहीच कारवाई करण्यात आली नाही. डिएचओ डॉ. चव्हाण यांनी व्यस्त कार्यक्रमामुळे कारवाईचा प्रस्ताव अद्याप पाठविता आला नसल्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)