परीक्षा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवू नका!
By admin | Published: March 4, 2017 12:45 AM2017-03-04T00:45:25+5:302017-03-04T00:45:25+5:30
राज्य शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे.
परीक्षार्थ्यांचे हीत जोपासा : दक्षता समिती सदस्यांची मागणी
पुलगाव : राज्य शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. शहरातील दोन केंद्रांवरून शेकडो परीक्षार्थी बारावीचे पेपर देत आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन परीक्षा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त परिक्षार्थी शिक्षण मंडळाने देवू नयेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
परीक्षा काळात विद्यार्थ्यांना शांत चित्ताने व एकाग्रपणे परीक्षा देता यावी यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर पत्रकार, नगरसेवक, पोलीस प्रशासन यांचा समावेश असलेली दक्षता कमिटी असते. परीक्षापुर्वी या कमिटीची सभा घेण्यात येते. या कमिटीने परीक्षा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त परीक्षार्थी शिक्षण मंडळाने देवू नये, अशी मागणी अनेकदा केली आहे; पण शिक्षण मंडळ या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. फोफावलेल्या शिक्षण संस्था, वाढलेली विद्यार्थी संख्या यामुळे पर्यायाने दहावी, बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली. वाढलेल्या परीक्षार्थी संख्या व वाढलेले परीक्षा शुल्क यामुळे परीक्षा मंडळ आर्थिक दृष्टीने विचार करून परीक्षा केंद्राची संख्या कमी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी देणे, कॅशलेस आर्थिक व्यवहाराचे नावावर परीक्षा केंद्रासाठी अग्रिम राशी न देणे, इत्यादी कामे लादत आहेत. पुर्वी शहरात ३-४ परीक्षा केंद्रातून विद्यार्थी परीक्षा देत होते. परीक्षेत १ आसन १ परीक्षार्थी असा नियम आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या क्षमतेनुसार विद्यार्थी संख्याही राहत असे. मागील काही वर्षापासून शहरात बारावी व दहावीच्या परीक्षेकरिता केवळ दोनच केंद्र राहत असल्यामुळे या केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त परीक्षार्थी येत आहे. परिणामी, परीक्षा मंडळाच्या नियमाला फाटा मिळत आहे. एका बाकावर दोन विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचण होत असल्याचे दिसून आल्याने दक्षता समितीच्या सदस्यांनी केंद्राच्या क्षमते इतकीच परीक्षार्थी संख्या देण्याची मागणी केली आहे. तसेच या वर्षी कॅशलेस व्यवहाराचे नावावर परीक्षा केंद्राच्या खर्चासाठी अग्रिम राशी देण्यात आली नसल्याने बँकेतून चारदा होणारे आर्थिक व्यवहार त्यानंतर पडणारा भूर्दंड याचाही विचार करण्याची केंद्र संचालकावर वेळ आली आहे. राज्य परीक्षा मंडळाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)