सेवा हमी कायद्याची गरज भासवू नका
By admin | Published: May 27, 2017 12:30 AM2017-05-27T00:30:58+5:302017-05-27T00:30:58+5:30
अभ्यासू व्यक्तीमत्त्व असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे विदर्भाचा विकास झपाट्याने होत आहे.
ग.दि. कुलथे यांचे आवाहन : महाराष्ट्र राज्य राजपत्रित संघाची बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अभ्यासू व्यक्तीमत्त्व असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे विदर्भाचा विकास झपाट्याने होत आहे. मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला सेवेची हमी देणारा कायदा केला. अधिकाऱ्यांनी या सेवा हमी कायद्याची गरजच पडणार नाही, इतक्या चांगल्या सेवा जनतेला उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे यांनी केले.
शुक्रवारी जिल्हा परिषद सभागृहात महाराष्ट्र राज्य राजपत्रित संघाची बैठक अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित होती. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. प्रमोद रक्षमवार, राज्य संघटक शिवदास वासे, निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे, संघमित्रा ढोके यांची उपस्थिती होती.
अधिकारी कर्मचारी यांच्या मागण्यांचा पाठपुरावा सतत राज्य शासनाकडे महासंघ करीत आहे. यामध्ये निवृत्तीचे वय केंद्राप्रमाणे ६० वर्षे करण्यात यावे, या मागणीचा अभ्यास करण्यासाठी कटुवा समिती नेमली आहे. पुढील तीन महिन्यात यावर निर्णय होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. महिला कर्मचाऱ्यांना बाल संगोपन रजा केंद्राप्रमाणे दोन वर्षे करण्यात यावी, या मागणीसाठी जास्त पाठपुरावा करावा लागणार आहे. प्रधान सचिव भगवान सहाय यांच्याकडे हा विषय सोपविण्यात आला असून याबाबतीत सर्व विभागांचा अभिप्राय मागविण्यात येत आहे. जनतेची कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांची गरज आहे. यामुळे रिक्त पदे भरण्यात यावी, पाच दिवसाचा आठवडा करण्यात यावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे वारंवार बैठका घेण्यात आल्या. यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक आहे.
शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांना महासंघाचा पाठिंबा
शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांने अन्न पिकविले नाही तर अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे आता शेतकरी आणि शासनाने एकत्र बसून यातून मार्ग काढण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या सर्व न्याय मागण्यांना अधिकारी महासंघाचा जाहीर पाठींबा असल्याचे कुलथे म्हणाले.