सोयाबीन विकण्याची घाई करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:03 AM2018-10-17T00:03:27+5:302018-10-17T00:04:15+5:30
खरीप हंगामातील सोयाबीन निघण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकरी शेतातून निघालेले सोयाबीन थेट बाजारात विक्रीसाठी आणत आहे. मात्र, सोयाबीन विक्रीची घाई शेतकऱ्यांनी करू नये. बाजारभाव वधारण्याची दाट शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खरीप हंगामातील सोयाबीन निघण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकरी शेतातून निघालेले सोयाबीन थेट बाजारात विक्रीसाठी आणत आहे. मात्र, सोयाबीन विक्रीची घाई शेतकऱ्यांनी करू नये. बाजारभाव वधारण्याची दाट शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
वर्धा जिल्ह्यात खरीपात कापूस व सोयाबीन हे दोन प्रमुख पीके आहे. सुरुवातीला लागवड केलेले सोयाबीन निघण्यास सुरुवात झाली असून जिल्ह्याच्या विविध बाजारपेठेत सोयाबीनचे दर हे तीन हजाराच्यावर आहेत. हिंगणघाट बाजार पेठेत १५ आॅक्टोबरला सोयाबीन ३ हजार १५५, सेलू बाजारपेठेत ३ हजार ७० रूपये भाव होता तर समुद्रपूर येथे मंगळवारी सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. तेथे ३ हजार ८५ रूपये भाव सोयाबीनला देण्यात आला. ही बहुतांश खरेदी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. शासनाच्या नाफेडमार्फत अजूनही सोयाबीन खरेदीला सुरुवात झालेली नाही. केवळ आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे. यंदा राज्यात सोयाबीनचे उत्पादन कमी असल्याने सोयाबीनचे भाव वधारण्याची शक्यता आहे. सोयाबीनचे हमीभाव ३ हजार ३९९ झाले आहे. केंद्रसरकारने सोयाबीनवर आयात शुल्क ४४ टक्के केले असून सोयाबीनच्या निर्यातीवर १० टक्के सबसीडी जाहीर केली आहे. राज्य सरकारने ४० लाख मॅट्रीक टन, सोयापेंड निर्यात करण्याचा करार चीन सोबत केल्याने सोयाबीनला भाव मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तारण योजनेचा लाभ घ्यावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
उतारा कमी
यंदा वर्धा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. केवळ ७७ टक्केच पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी एकरी अडीच पोत्यांचाच उतारे आले आहेत. त्यामुळे सोयाबीनचे भाव वधारण्याची शक्यता आहे. जागतीक बाजारपेठेतही सोयाबीनची मागणी तेजीत राहण्याची शक्यता असून दिवाळीनंतरही सोयाबीनचे मार्केट टाईट राहिल, असे जाणकार सांगतात.
यावर्षी केंद्रसरकारने सोयाबीन, कापूस, चना याच्या हमीभावात वाढ केली आहे. याचा निश्चितपणे फायदा शेतकºयांना होणार आहे. कापसाचे हमीभाव ४ हजार २०० वरून ५ हजार ४५० करण्यात आले. सोयाबीनचे हमीभाव ३ हजार ३९९ करण्यात आले. शेतकऱ्यांना नाफेडला माल विकत यावा म्हणून आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया १ ते ३१ आॅक्टोबर या काळात सुरू आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
- प्रशांत इंगळे तिगावकर, सदस्य राज्य कृषीमूल्य आयोग.
वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी हितार्थ विविध निर्णय घेत असून मागील काही वर्षांपासून शेतमाल तारण योजना येथे राबविली जात आहे. यंदा या योजनेचा शुभारंभ सोमवारी झाला. सुमारे ५ हजार पोते सोयाबीन शेतकरी शेतमाल तारण योजनेच्या माध्यमातून आमच्याकडे ठेवतील यासाठी आम्ही १० हजार पोते शेतमाल साठवणूक क्षमतेची दोन गोदाम सज्ज केले आहेत.
- श्याम कार्लेकर, सभापती कृउबा समिती, वर्धा.