वन्यप्राण्यांचा बंदोबस्त तुम्ही करता, की आम्ही करू? शेतकऱ्यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 12:14 PM2020-10-27T12:14:59+5:302020-10-27T12:15:35+5:30
Wardha news farmer शेतकऱ्यांच्या तोंडचा घास एका रात्रीतून हिसकावला जात असला तरी वनविभाग हातावर हात ठेवून कायद्याची भाषा करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : निसर्गकोपात शेतकऱ्यांचे उभे पीक नष्ट झाले. उरल्यासुरल्या पिकांवर वन्यप्राणी ताव मारत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. वन्यप्राण्यांनी थेट चिकणी,जामणी, पढेगाव, सोनेगाव, निमगाव, केळापूर, दहेगावकडे मोर्चा वळविला आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास एका रात्रीतून हिसकावला जात असला तरी वनविभाग हातावर हात ठेवून कायद्याची भाषा करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला असून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा; अन्यथा मारण्याची परवानगी द्या, अशी मागणी ते करीत आहेत.
वन्यप्राण्यांमध्ये रानडुक्कर व रोही यांचे कळप शेतात शिरून पिकांची नासाडी करतात. वनविभागाकडून नुकसान भरपाईच्या नावावर थट्टा केली जाते . एवढेच नव्हे, तर रानडुक्कर संधी साधून शेतकऱ्यांवर हल्ला करतात. यात अनेक शेतकरी व शेतमजूर जखमी झाले. वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे रात्रीची जागली बंद झाली. मजूर शेतात कामावर येताना वन्यप्राण्यांची भीती व्यक्त करतात. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना काम करण्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांचा केव्हा जीव जाईल याचा नेम नाही, जनावरांबरोबर माणसांवरील हल्लेही वाढले आहेत.
शासनाने शेतकऱ्यांना दिवसभर वीज मिळेल अशी व्यवस्था करावी, म्हणजे रात्री जीव धोक्यात घालून ओलित करण्याची वेळ येणार नाही.
शेती करण्यासाठी संपूर्ण संरक्षण द्यावे; अन्यथा शेतकरी स्वत:च वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करेल, त्यासाठी वन्यप्राण्यांना मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.
शेतीचे नवे संकट
निसर्गाचा लहरीपणा आणि शेतकरी विरोधीधोरणात भरडल्या गेलेल्या शेतकऱ्याला आता वन्यप्राण्यांमुळे नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे . यात शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावला जात असल्याने योग्य उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
रानडुक्कर, रोही व अन्य वन्यप्राण्यांचे कळप उभे पीक फस्त करीत आहेत. वनविभागाने शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कायद्यात शिथिलता आणून शेतकऱ्यांना शस्त्र परवाने देण्याची गरज आहे.
- सतीश दाणी, शेतकरी सोनेगाव (आबाजी).